पिंपरी : हिंजवडी गावात रस्ता रुंदीकरणानंतर झालेला राडारोडा उचलण्यासाठी कार्यवाही सुरू असताना ‘पीएमआरडीए’ पथकाला आणि पोलिसांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पथकाला स्थानिक जागामालकांनी विरोध केला. पोलिसांनाही अरेरावी केली. आधी मोबदला द्या, मगच ताबा घ्या, अशी मागणी करत राडारोडा हटवण्यास विरोध करत ठिय्या आंदोलन केले. हिंजवडी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.
हिंजवडी-माण रस्त्यावर गुरुवारी (दि. ७ ऑगस्ट) दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. कार्यवाही झाल्यानंतर सायंकाळी दोघा ग्रामस्थांना सोडून दिले. हिंजवडी आयटी पार्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (पीएमआरडीए) रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान, झालेला राडारोडा उचलण्याची कार्यवाही पीएमआरडीए पथकामार्फत गुरुवारी सुरू केली. सकाळी दहाच्या सुमारास हिंजवडी-माण रस्त्यावर पांडवनगर येथे उपजिल्हाधिकारी, पोलिस उपायुक्त, तसेच तहसीलदार यंत्रसामग्री, मजुरांसह दाखल झाले होते. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.
‘पीएमआरडीए’च्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत ग्रामस्थांचा वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी पोलिस तेथे गेले असता ग्रामस्थांनी पोलिसांनाही अरेरावी केली. त्यामुळे अरेरावी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दुपारी दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. राडारोडा उचलण्याची कार्यवाही झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता दोघा ग्रामस्थांना सोडून देण्यात आले. दरम्यान, आंदोलनस्थळी आमदार शंकर मांडेकर आले. त्यांनी अधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली. पीएमआरडीए आयुक्तांच्या लेखी आदेशानुसार, जागा मालकांना टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलक शांत झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.
राडारोडा उचलण्यास काही ग्रामस्थांनी विरोध केला. यातील दोघांना ताब्यात घेतले होते. राडारोडा उचलण्याची कार्यवाही झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. - विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त
भूसंपादन करण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे पथक आले आहे, असा समज ग्रामस्थांचा झाला. यातून विरोध केला; मात्र कायदेशीर कार्यवाही करूनच भूसंपादन होईल; तसेच रस्ताबाधितांना कायदेशीर टीडीआर देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होऊन राडारोडा उचलण्याची कार्यवाही करण्यात आली.- डाॅ. दीप्ती सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी, अतिक्रमण निर्मूलन विभाग, ‘पीएमआरडीए’