Pimpri-Chinchwad: Sewage treatment plant discharges untreated Sewage water into river; students lift hunger strike | Video : 'ना कुठली सभा ना कुठले राजकारण'; पिंपरीत धो-धो पावसात भिजणारे 'ते' युवक ठरले चर्चेचे कारण!

Video : 'ना कुठली सभा ना कुठले राजकारण'; पिंपरीत धो-धो पावसात भिजणारे 'ते' युवक ठरले चर्चेचे कारण!

ठळक मुद्देयावेळी आंदोलनकर्त्यांनी पर्यावरण पूरक विविध मागण्या केल्या

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळत होता.त्या पावसाने सर्वांचीच तारांबळ देखील उडाली. पण या भर पावसात ते दोन तरुण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारतीसमोर तसेच भिजत बसून राहिले. खरंतर पावसात भिजून त्यांना कुठलीही सभा गाजवायची नव्हती तर त्यांचे प्रश्न खूप साधे, सरळ आणि समाज हिताचे होते. जलप्रदूषणाच्या मुद्द्यावर दोन दिवसांपासून तीव्र आंदोलन छेडणाऱ्या त्या दोन युवकांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून ते सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.. 

रयत विद्यार्थी परिषदेचे सचिव रविराज काळे, ऋषिकेश कानवटे अशी त्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या युवकांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीसमोर रयत विद्यार्थी परिषदेच्या तरुणांनी पिंपळे निलख येथील जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण ठेकेदाराला भाडेतत्वावर न देता पालिकेने चालवावा यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून लाक्षणिक बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

पिंपळे निलख येथील मैला शुद्धीकरण केंद्राने देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडले होते. परंतू ,देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदाराला पिंपरी चिंचवड महापालिकेने कोणत्याही स्वरूपाची अधिकृत परवानगी दिलेली नव्हती. तरीदेखील ७ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर या कालावधीत सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता ते बायपासद्वारे नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे नदीपात्रातील जीवसृष्टीस धोका असल्याचे निदर्शनास आणून देत रयत विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी भर पावसात लाक्षणिक उपोषण करत या गंभीर विषयाला वाचा फोडली आहे . 

पिंपळे निलख येथील महापालिकेच्या मैला शुद्धीकरण केंद्राविरुद्ध आंदोलनकर्त्यांनी तक्रार केली होती. त्यात या मैला शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते नदीपात्रात वारंवार सोडण्यात आले. यामुळे नदीपात्रातील जीवसृष्टीस धोका असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे ई-मेल द्वारा तक्रार केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे याबाबतचा लेखी खुलासा मागितला होता. परंतु, आजपर्यंत महापालिकेने तो दिलेला नाही. यानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधीने पिंपळे निलख येथील मैला शुद्धीकरण केंद्राला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास बायपास करण्यासाठी असलेली वेगळी पाईपलाईन दाखवून दिली. त्यांनी त्यासंबंधीची माहिती त्यांच्या अहवालात नमूद केली आहे.


यावेळी आंदोलनकर्त्यांनी या संबंधी विविध मागण्या केल्या. त्यात पिंपळे निलख येथिल जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठेकेदाराकडे भाडेतत्त्वावर न देता स्वत: पालिकेने चालवावा. तसेच ७ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडले या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. विनय इंजिनिअरिंग प्रा. ली या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे. पिंपळे निलख येथिल जलशुद्धीकरण केंद्रात असणारी बायपासची लाईन पुर्णपणे उखडून टाकावी. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी म्हणून पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी यांचे निलंबन करण्यात याव्या अशा मागण्यांचा समावेश आहे. 

Web Title: Pimpri-Chinchwad: Sewage treatment plant discharges untreated Sewage water into river; students lift hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.