प्रशांत होनमानेपिंपरी : शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरकांच्या कार्यालयांत, गोदामांबाहेर शुक्रवारी (दि. १३) ग्राहकांची गर्दी, रांगा आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. ‘लोकमत’ने विविध भागांतील गॅस एजन्सींना भेट देऊन केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत हेच चित्र होते.
ग्राहकांना वर्षभरात १५ सिलिंडर देण्याचा नियम आहे. मात्र, काही ठिकाणी १२ सिलिंडरची मर्यादा सांगून ग्राहकांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. एका सिलिंडरधारकाला साधारण २५ दिवसांनी, तर दोन सिलिंडरधारकाना ३० दिवसांनी बुकिंग करता येते.
दरम्यान, काही ग्राहकांना ओटीपी न मिळणे, ऑनलाइन बुकिंग होत नसणे, बुकिंग नंबर बंद असणे अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिक थेट एजन्सी कार्यालयांवर धाव घेत असून, वितरण केंद्रांबाहेर गर्दी वाढली आहे. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडर जास्त दराने विक्री होत असल्याचे समजते.
आज ‘ब्लॅक’ने विकाल, उद्या तुमच्या गॅसचे काय?काही घरगुती गॅस ग्राहक जास्त नफ्याच्या लालसेने सिलिंडर व्यावसायिक ग्राहकांना चार ते पाच हजारांना विकत आहेत. मात्र, घरगुती गॅसचे बुकिंग आता ३० दिवसांनंतरच करता येते. त्यामुळे आज पैशासाठी गॅस विकाल, पण उद्या स्वतःच्या घरासाठी गॅस कुठून आणणार, असा प्रश्न आहे. काळाबाजार करणारे ग्राहकच क्षणिक नफ्यासाठी स्वतःला अडचणीत टाकत आहेत.
गर्दीत गॅस टाकी लंपास; ग्राहक हवालदिल
चिंचवड येथे गॅस बुकिंगसाठी आलेल्या ग्राहकाची टाकी गर्दीतून लंपास झाल्याची घटना घडली. संबंधित ग्राहक सकाळपासून रांगेत उभा होता. काही वेळ रांगेबाहेर गेल्यानंतर त्याने ठेवलेली टाकी कोणीतरी घेऊन गेल्याचे त्याच्या लक्षात आले.
आठ तारखेला गॅसचे बुकिंग केले होते. आज सकाळी दहा वाजता एजन्सीवर आलो. सोबत लहान बाळ असल्याने विनंती केल्यानंतर दुपारी सुमारे १२ वाजता सिलिंडर मिळाला. मात्र, गर्दी खूप असल्याने टाकी मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. - राजेंद्र गोरे, सह्याद्री कॉलनी, चिंचवडगाव
सोमवारी बुकिंग केले होते. बुधवारी गाडी आली, पण पावती झाली नसल्याने सिलिंडर मिळाला नाही. एजन्सीचा बुकिंग नंबर दोन दिवस बंद आहे आणि ऑनलाइन बुकिंगही होत नाही. अडचण येऊ नये, म्हणून ॲडव्हान्स बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. - राजेश सुतार, देहू
सकाळी नऊ वाजता बुकिंग करून एक जण रांगेत नंबर सांभाळतोय, तर मी सिलिंडरकडे लक्ष ठेवत आहे. घरपोच डिलिव्हरीसाठी पाच दिवस लागतील, असे सांगितल्याने रांगेतून सिलिंडर मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. - परशुराम मोरे, दत्तनगर, चिंचवड
आमच्याकडे दोन सिलिंडर टाक्या आहेत. एक सिलिंडर दोन दिवसांपूर्वी बुक केला होता. आज सकाळी दहा वाजता येऊन थांबलो आहे. दुपारी दोननंतर सिलिंडर मिळेल, असे सांगितले. - शारदाबाई धोत्रे, नेहरूनगर
वर्षभरात १२ गॅस सिलिंडर घेतले आहेत. एजन्सीकडून १२ पेक्षा जास्त गॅस मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. गॅस संपला तर काय करायचे, हा प्रश्न आहे. - अमोल गायकवाड, निगडी प्राधिकरणमोबाइलवर बुकिंग होत नसल्याने वितरकांकडे आलो. महिना पूर्ण झाला नसल्याने १७ तारखेला बुकिंग करा, असे सांगितले. गॅस संपेल, या भीतीने आधीच बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. - हणमंत शिंदे, चिंचवडेनगर.
Web Summary : Pimpri residents face gas cylinder shortages, leading to long queues and chaos at distribution centers. Issues include booking problems, OTP failures, and alleged black market sales, leaving consumers struggling to secure essential gas supplies.
Web Summary : पिंपरी के निवासियों को गैस सिलेंडर की कमी का सामना करना पड़ रहा है, जिससे वितरण केंद्रों पर लंबी कतारें और अराजकता है। बुकिंग की समस्या, ओटीपी विफलताएं और कथित काला बाजारी बिक्री शामिल हैं, जिससे उपभोक्ताओं को आवश्यक गैस आपूर्ति हासिल करने में कठिनाई हो रही है।