पिंपरी : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजू नये, यासाठी पतीने खोटी चिठ्ठी लिहून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी पिंपळे सौदागर येथे घडली.
हिमांशू दिनेश जैन (३५, रा. पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या वडिलांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जावई हिमांशू याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी हिमांशू याच्या मुलीचे निधन झाले. त्यानंतर हिमांशू याने पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. सतत वाद करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर हिमांशू याने खोटी चिठ्ठी लिहून ठेवली. मात्र, त्याचे हे बिंग फुटले आहे.