राज्यातील सत्ताबदलाचा पिंपरी-चिंचवडलाही झटका; अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 08:22 PM2023-07-06T20:22:40+5:302023-07-06T20:23:04+5:30

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची देखील बदली होणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे

Pimpri Chinchwad also hit by change of power in the state Transfer of Additional Commissioner Jitendra Wagh | राज्यातील सत्ताबदलाचा पिंपरी-चिंचवडलाही झटका; अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली

राज्यातील सत्ताबदलाचा पिंपरी-चिंचवडलाही झटका; अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची बदली

googlenewsNext

पिंपरी : राज्यातील सत्तेत झालेल्या बदलाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांना पहिला झटका बसला आहे. त्यांची राज्य शासनाने मुदतपूर्व बदली केली असून त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्तपदी विजयकुमार खोराटे यांची वर्णी लागली आहे.

पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (जमीन) या पदावरून वाघ यांची २१ सप्टेंबर २०२१ रोजी पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. प्रतिनियुक्तीवरील त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांच्या स्वाक्षरीने मुख्याधिकारी संवर्गातील अधिकारी विजयकुमार खोराटे यांची पिंपरी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावर प्रतिनियुक्तीने बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.

या आदेशात जितेंद्र वाघ यांची पिंपरी पालिकेतील प्रतिनियुक्तीवरील सेवा संपुष्टात आणून त्यांची सेवा मूळ महसूल व वन विभागात वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील सत्तेतील बदल आणि राजकीय स्थित्यतरांचा पहिला फटका वाघ यांना बसल्याचे या बदलीमुळे समोर आले आहे. पुढच्या काळात आणखी कोणाची बदली होणार, हे पाहावे लागणार आहे.

आयुक्तांच्या बदलीची चर्चा

सत्ताबदलानंतर आयुक्त शेखर सिंह पिंपरी-चिंचवड महापालिकेत रूजू झाले होते. मात्र, ते पालिकेत रूजू झाल्यापासून ते दबावाखाली काम करत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. राज्यातील सत्तेत झालेल्या बदलानंतर पहिला झटका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांना बसला आहे. परंतु, त्यांच्या पाठोपाठ लवकरच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची देखील बदली होणार आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

Web Title: Pimpri Chinchwad also hit by change of power in the state Transfer of Additional Commissioner Jitendra Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.