पिंपरी : भरधाव टेम्पोने तीन पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तर दोन महिला जखमी झाल्या. चाकण येथील आंबेठाण रस्त्यावर दावडमळा येथे गुरुवारी (दि. १५) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.जयराम तारासिंग चव्हाण (५२), असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. सतीश जयराम चव्हाण (२२, रा. दवडमळा, चाकण) यांनी शुक्रवारी चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील जयराम, आई शिलाबाई व आईच्या ओळखीच्या महिलेबरोबर पायी जात होते.
त्यावेळी अज्ञात चालकाने टेम्पो भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवत जयराम चव्हाण, शिलाबाई आणि त्यांच्या ओळखीच्या ज्योत्स्ना चव्हाण यांना धडक दिली. यामध्ये जयराम चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर शिलाबाई जखमी झाल्या.