पिंपरी : लघुशंका करताना शिंतोडे उडाल्याने दोघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाकड येथील भूमकर चौकात गुरुवारी (दि.१०) रात्री साडेआठच्या सुमारास मारहाणीचा हा प्रकार घडला होता.
राहुल कचरू घेवंदे (वय ४०, रा. भूमकर वस्ती, वाकड, मूळगाव चिखली. जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल यांच्या पत्नीने शनिवारी (दि. १२) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यश सुनील कलाटे (२२), मारुती किसन गुंडेकर (२१, दोघेही रा. कलाटे वस्ती, वाकड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल घेवंदे हे भूमकर चौकाजवळील मोकळ्या मैदानातून घरी जात होते. त्यावेळी तेथे यश कलाटे आणि मारुती गुंडेकर लघुशंका करत होते. त्यांच्या बाजूला राहुल घेवंदे देखील लघुशंका करत होते. त्यावेळी लघुशंकेचे शिंतोडे यश कलाटे याच्या पायावर पडले. त्या कारणावरून त्यांनी राहुल यांना शिवीगाळ केली. तू येथे लघवी का करतो, तुला निट लघवी करता येत नाही का, असे म्हणून संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात राहुल गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी (दि. १२) त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.