पिंपरी : तुमच्या क्रेडिट कार्डवर गुन्हेगारांच्या टोळीने कर्ज काढले आहे. या टोळीचे बँकांमध्ये खाते असून, त्यात तुमच्याही नावाच्या खात्यांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येईल, असे सांगून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालत वृद्ध महिलेला पैसे भरण्यास सांगितले. त्यासाठी वृद्ध महिला बँकेत गेली असता, बँक कर्मचारी-अधिकाऱ्यांना ती घाबरलेली दिसली. त्यामुळे त्यांनी तिला विचारपूस केली असता, फसवणुकीच्या प्रयत्नाचा प्रकार समोर आला.सांगवी येथे २८ आणि २९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी ७१ वर्षीय महिलेने २२ एप्रिल २०२५ रोजी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विजय पाटील, संदीप राव, दीपारनीता मुन्शीकर आणि एक अज्ञात महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृद्ध महिलेचा मुलगा विदेशात वास्तव्यास असून, महिला सांगवी येथे एकटीच राहत आहे. दरम्यान, संशयित महिलेने फिर्यादी वृद्ध महिलेला फोन केला. तुमच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून साडेतीन लाखांचे कर्ज काढले आहे. कर्ज थकल्याने न्यायालयात खटला दाखल केला आहे, असे संशयित महिलेने वृद्ध महिलेला सांगितले. त्यानंतर इतर संशयितांनीही वृद्ध महिलेशी फोनवरून संपर्क साधला. सीबीआयकडे प्रकरण वर्ग केले आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करावी लागेल, असे सांगत संशयितांनी वृद्धेला भीती दाखवली. केस बंद करण्यासाठी बँकेत पैसे भरा, असे सांगितले.पैसे भरण्यास सांगितल्याने वृद्ध महिला बँकेत ठेवीची रक्कम (एफडी) काढण्यासाठी गेली. पहिल्या दिवशी ठेवीची काही रक्कम घेतली. त्यानंतर पुन्हा रक्कम काढण्यासाठी वृद्धा बँकेत गेली. तिला खूप घाबरलेल्या अवस्थेत पाहून तसेच अचानक ठेवीची रक्कम काढण्याची काय आवश्यकता आहे, असे म्हणत बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विचारपूस केली. तेव्हा संशयितांनी पैशांची मागणी केल्याचे वृद्धेने सांगितले.बँक अधिकाऱ्यांनी वृद्धेला धीर देत हा डिजिटल अरेस्टचा प्रकार असल्याचे सांगितले. तसेच, तिला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे तपास करीत आहेत.बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांचे कौतुकवृद्ध महिलेला धीर देत तिला पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मदत केली. त्यांच्या सतर्कतेमुळे फसवणुकीचा प्रकार टळला. त्यामुळे पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांचा सन्मान करत कौतुक केले.
बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली वृद्धेची ‘डिजिटल अरेस्ट’; सांगवीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:57 IST