आळंदी : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व आळंदी ग्रामस्थांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सवाचे (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त ३ ते १० मे दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर अन्य पाहुण्यांची वेळ आणि कार्यक्रमाचा तपशील जाहीर केला जाणार आहे.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाकडून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण, अद्याप तारीख, वेळ निश्चित झालेली नाही. येत्या आठवडाभरात पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख आणि वेळ निश्चिती होईल. त्यानंतर अधिकृतपणे कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली जाईल, असे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांनी सांगितले.