पिंपरी : पिंपरी कॅम्पातील बाजारपेठ परिसरात भरदिवसा दुकानात घुसून व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवत जबरी चोरी करणारा आणि गुन्हा करताना गोळीबार करून पसार झालेला संशयिताला अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सातशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताचा माग काढून त्याला बेड्या ठोकल्या.
रवींद्र भाऊसाहेब घारे (वय ४०, रा. चिखली, मूळगाव ओझर्डे, ता. मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी कॅम्पात १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी एकच्या सुमारास ओमकार जनरल स्टोअर्स येथे ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या संशयिताने दुकानात येत हिंदीतून “दस वाला फ्रुटी दे!” असे म्हणत व्यावसायिकाला पिस्तूल दाखवत धमकावले आणि गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने ओढून घेतली.
तसेच गोळी झाडून व्यावसायिकाला जखमी केले. त्यानंतर तो पूळून गेला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनाय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या १० पथकांची स्थापना केली. अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त विशाल हिरे व मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक पांडुरंग देवकाते, दतात्रय गुळीग यांच्या पथकाने संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी पाच दिवस सातशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.
संशयिताने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुन्हा केला. त्याने मोबाइलचा वापर केला नाही. चेहरा लपवण्यासाठी हेल्मेट व रेनकोटचा वापर केला. त्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला. पिंपरी येथून पळून जाताना त्याने पाच ठिकाणी दुचाकी बदलल्या. त्यासाठी शिरगाव पोलिस ठाण्याच्या तसेच हद्दीत तसेच वडगाव मावळ येथे दुचाकी चोरी केली. ठराविक अंतर गेल्यानंतर चोरी केलेली दुचाकी तेथेच सोडून दुसरी दुचाकी चोरून त्यावरून तो चिखली येथे आला.
हेल्मेट आणि चपलेवरून मिळाला ‘क्ल्यू’
घटनेनंतर पिंपरी कॅम्पातून पळून जाताना रवींद्र घारे याने रस्त्यात रेनकोट काढला. तसेच पाच दुचाकी बदलवल्या. मात्र, त्याने हेल्मेट काढले नाही. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. दुचाकी बदलली तरी त्याने घातलेले हेल्मेट आणि चप्पल यावरून फुटेजची पाहणी करून पोलिसांनी मागोवा घेतला. दरम्यान चिखली येथे त्याने हेल्मेट काढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले. चिखलीतून ६ ऑगस्ट रोजी त्याला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, ११ जिवंत काडतुसे, १० ग्रॅमची सोनसाखळी, दोन दुचाकी जप्त केल्या.
गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य
बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात रवींद्र घारे फरार होता. अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या रवी पुजारी व सुरेश पुजारी टोळीचा तो सक्रिय सदस्य असल्याचेही निष्पन्न झाले असून, त्याच्यावर यापूर्वी दोन वेळा ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झालेली आहे. खून, खंडणी, जबरी चोरी, वाहन चोरी, गोळीबार, असे २५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत. पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरी प्रकरणासोबतच, चिंचवड, एमआयडीसी भोसरी आणि वडगाव मावळ येथील दुचाकी चोरीचे तीन गुन्हेही उघड झाले. त्याने आतापर्यंत विविध गुन्हे करताना सहा वेळा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे.