- रवींद्र जगधने
पिंपरी : पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलाखालील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईतील महापालिकेच्या अधिकृत गाळ्यांचा ताबा राजकीय पदाधिकारी असलेल्या माफियाने घेतला आहे. महापालिकेला या गाळ्यांमधून एक रुपयाचाही महसूल मिळत नाही. कारण भूमी जिंदगी विभाग आणि ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाकडे याबाबत कोणतीही नोंद नाही.
या गाळ्यांमध्ये व्यवसाय सुरू आहेत आणि शेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याने माफियाचा कारभार बिनबोभाट सुरू आहे. संबंधित माफियाने एका गाळ्यात स्वतःचे कार्यालय थाटले असून, तेथूनच बेकायदा पार्किंगची आणि गाळ्यांची भाडेवसुली चालते.
भाजी मंडईत येणाऱ्या ग्राहकांच्या अधिकृत पार्किंगसाठी एका कंपनीला महापालिकेने जागा दिली असली, तरी मंडईच्या प्रवेशद्वाराजवळील दोन फळ विक्रेत्यांकडून दिवसाला एक हजार रुपये घेतले जातात. फळ विक्रेत्यांकडून महिन्याला ३० हजार रुपयांची वसुली केली जात असल्याची माहिती आहे.
बेकायदा पार्किंगमधूनही मोठी कमाई
महापालिकेच्या अधिकृत पार्किंगशेजारीच माफियाचे दुचाकी पार्किंग वर्षानुवर्षे बेकायदा सुरू आहे. रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांकडूनही वसुली केली जाते. यापूर्वी परिसरातील व्यावसायिकांकडून हप्ते वसूल करणारा हा माफिया विरोध वाढल्याने आता महापालिकेच्या जागेवरील पार्किंगकडे आणि गाळे भाडे वसुलीकडे वळला आहे. पोलिसांची ‘खातिरदारी’, अधिकाऱ्यांना हप्ते
माफियाची पोलिस ठाण्यात ऊठबस आहे. विरोध करणाऱ्यांवर पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकला जातो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या सर्व वसुलीतून हजारो रुपयांचे हप्ते मिळत असल्याचा आरोप व्यावसायिक करतात.
यामुळे परिसरात माफियाचे साम्राज्य मजबूत झाले आहे. या प्रकरणाने महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने सामान्य व्यावसायिकांची लूट सुरू असताना, महापालिका प्रशासन कधी कारवाई करणार, हा प्रश्न आहे.
महापालिकेच्या गाळ्यांची व जागेची सर्व माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जे महापालिका अधिकारी व कर्मचारी हप्ते वसुली करत आहेत, त्याचीही चौकशी करणार आहोत. - निवेदिता घार्गे-काटकर, सहायक आयुक्त तथा अ क्षेत्रीय अधिकारी
पिंपरीतील महापालिकेच्या या गाळ्यांची माहिती ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे. या बेकायदा पार्किंगची जागा महापालिकेची आहे. तसे पत्र ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहे. - सीताराम बहुरे, उपायुक्त, भूमी जिंदगी विभाग, महापालिका
Web Summary : In Pimpri, a mafia controls shops under a flyover, collecting rent illegally. The municipality receives no revenue. Illegal parking adds to the profits, with officials allegedly taking bribes, enabling the mafia's unchecked rule and exploiting businesses.
Web Summary : पिंपरी में, एक माफिया फ्लाईओवर के नीचे दुकानों को नियंत्रित करता है, अवैध रूप से किराया वसूलता है। नगरपालिका को कोई राजस्व नहीं मिलता है। अवैध पार्किंग मुनाफे को बढ़ाती है, अधिकारियों पर रिश्वत लेने का आरोप है, जिससे माफिया का अनियंत्रित शासन और व्यवसायों का शोषण होता है।