पिंपरी : शनिवारी व रविवारी दोन दिवस पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. काही प्रमुख रस्त्यांवर अक्षरशः जलतरण तलावासारखी स्थिती निर्माण झाली होती. याशिवाय, दहा ठिकाणी झाडपडी झाली असून, रावेतमधील मधुर आंगण सोसायटीची भिंत कोसळली.
शहरातील प्रमुख मार्गांवर, विशेषतः पिंपरी, चिंचवडगाव, आकुर्डी, निगडी, थेरगाव, रावेत आणि दापोडी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पाण्यामुळे दुचाकीस्वार व चारचाकी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी वाहतूक तासभर खोळंबली. वाहतूक पोलिसांना अतिरिक्त कर्मचारी तैनात करून परिस्थिती नियंत्रित करावी लागली.
२४ तासांत ८५ मिमी पाऊस....
शहरात रविवारी सकाळपासून ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त निगडीमध्ये ८८ मिमी, चिंचवडमध्ये ८३.२ मिमी, पिंपळे गुरव मध्ये ८५.६ मिमी तर मोशी प्राधिकरणात ५७.८ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
झाडपडीच्या घटना वाढल्या...
मुसळधार पावसात वाऱ्याच्या जोरामुळे शहरातील विविध भागांत दहा झाडे कोसळली. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. रहाटणी, नेहरुनगर, निगडी आणि सांगवी भागांत झाडपडीच्या घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या आपात्कालीन विभागाने तातडीने झाडे हटविली.
रावेतमध्ये भिंत कोसळली...
रावेत येथील मधुर आंगण सोसायटीची सिमेंटची भिंत अचानक कोसळली. महापालिकेकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्थानिक नागरिक सोमनाथ गुरव यांनी सांगितले.
प्रशासन सज्ज, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतत पावसाचा आढावा घेत परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, झाडांच्या खाली व पार्किंगजवळ गाड्या लावू नयेत, तसेच जुने व कमकुवत इमारतींपासून दूर रहावे, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
पवना धरणातून विसर्ग...
मावळ परिसरातही मुसळधार पाऊस झाल्याने पवना धरणातील पाणी पातळी वाढली. त्यामुळे पवना धरणातून एक हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणातील पाण्याचा येवा वाढला तर धरणातून पाण्याचा जास्त विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी दिली.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी :
- अनावश्यक प्रवास टाळावा
- रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी
- मोठ्या झाडांजवळ व जुन्या इमारतींपासून दूर रहावे
- वीजपुरवठा खंडित झाल्यास महापालिकेला त्वरित कळवावे
- लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे
अग्निशमन विभागाचे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक :
पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७५
भोसरी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७६
प्राधिकरण अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७७
चिखली अग्निशमन केंद्र – ८६६९६९४१०१
थेरगाव अग्निशमन केंद्र – ७०३०९०७९९९
रहाटणी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७८
मोशी अग्निशमन केंद्र – ७२६४९४३३३३
तळवडे अग्निशमन केंद्र – ९५५२५२३१०१
चोविसावाडी अग्निशमन केंद्र – ८४८४८०३१०१
नेहरूनगर अग्निशमन केंद्र – ८४८४०५११०१