- रवींद्र जगधने पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्यात यावी, यासाठी खासगी कंपनीद्वारे २०१० पासून ई-हेल्थ कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली. सध्या ‘वायसीएम’मध्ये ही प्रणाली सुरू आहे; मात्र २०२० पासून पीव्हीसी स्मार्ट कार्ड स्वरूपातील केसपेपर क्रमांक असलेले हेल्थ कार्ड देणे बंद आहे. त्याऐवजी प्रत्येकवेळी चिठ्ठीवर हे कार्ड नव्याने छापून दिले जात आहे.‘वायसीएम’मध्ये केसपेपर खिडकीवर नवीन रुग्णाला पॅनकार्डप्रमाणे पीव्हीसी स्मार्ट कार्ड दिले जात होते. त्यावर रुग्णाचे नाव, पत्ता, वय व रुग्णाचा फोटो; तसेच युनिक केसपेपर क्रमांक (एमआरडी नंबर) होता. त्यासाठी एकदाच ३० रुपये शुल्क आकारले जात होते. त्यानंतर प्रत्येक वेळी फक्त १० रुपयांत बाह्यरुग्ण विभागाचे टोकन घ्यावे लागत होते.बाह्यरुग्ण विभागात गेल्यानंतर तेथील डॉक्टर रुग्णाचे वैद्यकीय उपचार, विविध तपासण्या, औषधे आदी माहिती डिजिटल स्वरूपात त्याच्या एमआरडी नंबरवर नोंद करतात. रुग्णाच्या सोनोग्राफी, एक्स-रे किंवा रक्ताच्या तपासण्या झाल्यास त्याचे अहवालही नोंद होतात. औषधेही एमआरडी नंबरवरून दिली जातात. या प्रणालीमुळे अचूक निदान, वैद्यकीय उपचार, रुग्णांचा वैद्यकीय इतिहास जतन करणे सोपे झाले आहे. ही सेवा पूर्ण ऑनलाइन आहे.एकदा उपचार घेऊन गेल्यानंतर पुन्हा अनेक वर्षांनंतरही रुग्ण आल्यास केसपेपर काढताना पहिल्यांदा हेल्थ कार्ड तपासले जाते. त्या माध्यमातून रुग्णाची पूर्वपीठिका समजते. त्यानंतर पुढील उपचार दिले जातात. त्यामुळे रुग्णांना ढीगभर कागदपत्रे जवळ बाळगावी लागत नाहीत. वेळेची बचत होते. मात्र, कोरोना कालवधीमध्ये २०२० पासून हे हेल्थ कार्ड बंद करण्यात आले. आता टोकनच्या चिठ्ठीवर हे कार्ड छापून दिले जात आहे. यामुळे एका रुग्णाचे एकाहून अधिक एमआरडी नंबर तयार होत असल्याने रुग्णांचा वैद्यकीय इतिहास जाणून घेण्यात डाॅक्टरांना अडचणी येत आहेत. एक-एका रुग्णाचे वीस-वीस कार्डचिठ्ठी गहाळ झाल्यास किंवा चिठ्ठीवरील शाई पुसली गेल्यास रुग्णांना नवीन एमआरडी क्रमांक काढावा लागतो. त्यामुळे एक-एका रुग्णांचे २०-२० एमआरडी नंबर तयार झाले आहेत. त्यामुळे त्याचा वैद्यकीय इतिहास जतन होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. हेल्थ कार्डचे प्रिंटर धूळखातहेल्थ कार्डसाठी महापालिकेने खरेदी केलेल्या छपाई मशीन धूळखात पडून आहेत. होलसेल बाजारात अशा पीव्हीसी स्मार्ट कार्डची किंमत पाच रुपयांपेक्षाही कमी असताना महापालिका कार्ड खरेदी करण्याची तसदी घेत नाही.
महापालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांसाठी केंद्रीय डिजिटल प्रणाली सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे ‘वायसीएम’मधील ठेकेदारीला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. आता महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसाठी निविदा काढली जाणार आहे. पुढील चार महिन्यांत सर्वच रुग्णालयांत ही प्रणाली सुरू होणार आहे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका