पिंपरी : औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर काळाने घाला घातला. भरधाव मिक्सरखाली सापडल्याने पंडितराव माधवराव समर्थ (वय ६६, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांचा जागीच मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथील पीके चौकात शुक्रवारी (दि.१) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ हे शुक्रवारी दुपारी औषधी आणण्यासाठी घरातून निघाले. ॲक्टिव्हा दुचाकीवरून पिंपळे सौदागर येथील निसर्ग क्लिनिकमध्ये जात असताना पीके चौकाजवळ आले.
त्यावेळी भरधाव मिक्सरने त्यांना चिरडले. मिक्सरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर मिक्सर चालक पसार झाला. घटनेची माहिती मिळतच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.