पिंपरी : आरोग्य विभागाला ग्रामीण भागात आरोग्य जागृती आणि प्रतिबंधक कार्यक्रमांसाठी दान केलेल्या तीन स्कोडा गाड्यांचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या गाड्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक वापरासाठी दिल्या गेल्या आहेत, याप्रकरणी तातडीने चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
एप्रिल २०२५ मध्ये गे स्टम्प कंपनी आणि होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन यांनी औंध जिल्हा रुग्णालयाला तीन चारचाकी वाहने दान करण्याचा प्रस्ताव दिला होता. ग्रामीण भागात मातृ-बाल आरोग्य, कुपोषण, बाल लैंगिक शोषण प्रतिबंध, क्षयरोग, मलेरिया, किशोर आरोग्य आणि एचआयव्ही/एड्स यासंबंधी जागृती अभियान राबवण्यासाठी ही वाहने देण्यात आली. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी औपचारिकरीत्या ही स्कोडा वाहने जिल्हा रुग्णालयात हस्तांतरित करण्यात आली.
या वाहनांचा वापर मोबाइल हेल्थ युनिट्स, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी, तसेच आपत्कालीन आरोग्य तपासण्या आणि राष्ट्रीय कार्यक्रमांच्या देखरेखीसाठी करायचा होता. दात्यांना तीन वर्षे वापर अहवाल सादर करणे बंधनकारक होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या मते, ही वाहने ग्रामीण अभियानासाठी वापरली जात नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली गेली आहेत, असा आरोप होत आहे.
आरोग्य कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी सांगितले, ‘एमएच. १४, एमव्ही. ५०७३ ही गाडी एका मंत्र्याच्या विशेष अधिकारी (ओएसडी) यांना, एमएच. १४, एमव्ही. ५०७४ जिल्हा शल्यचिकित्सकांना आणि एमएच. १४, एमव्ही. ५०७५ उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे यांना दिली आहे. इंधन, देखभाल, ड्रायव्हर खर्च सरकारकडून होणार असल्याने गाड्या दान करण्याचा उद्देशच संपुष्टात येतो. हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील मोठा गैरव्यवहार आहे.
या वाहनांचा वापर रुग्णांसाठी नाही. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम योग्य राबवले जात आहेत की नाही याची देखरेख आणि मोहीम राबवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्या वापरल्या जात आहेत. आरोग्य मंत्र्यांचे ओएसडी यांच्याकडे एक वाहन असून, कोल्हापूर सहायक संचालक यांच्याकडे राज्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक व माझ्याकडे एक वाहन आहे. - डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय
पुणे शहर व ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी दिलेल्या या गाड्यांचा वापर वैयक्तिक कारणासाठी होताना दिसत आहे. रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय असून या गाड्याच्या वापराबाबत सखोल चौकशी व्हावी. - शरत शेट्टी, आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते
जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी ही वाहने देण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत राज्यात गुणवत्ता कामगिरीत हे रुग्णालय दुसऱ्या क्रमांकावरून तळाशी आहे. प्रशासनाने दानाचा हेतू जपला नाही. - प्रभा प्रशांत रिकमे, सामाजिक कार्यकर्त्या
Web Summary : Pimpri: Allegations arise that donated health vehicles are misused by officials. These vehicles, intended for rural health programs, are reportedly used for personal purposes. Activists demand an immediate inquiry into potential misuse and call for accountability in the health system.
Web Summary : पिंपरी: आरोप है कि दान की गई स्वास्थ्य गाड़ियों का अधिकारियों द्वारा दुरुपयोग किया जा रहा है। ग्रामीण स्वास्थ्य कार्यक्रमों के लिए दिए गए इन वाहनों का कथित तौर पर निजी उद्देश्यों के लिए उपयोग किया जा रहा है। कार्यकर्ताओं ने तत्काल जांच की मांग की।