पिंपरी : ‘एआय’चा वापर करून महिलेचे फेक अकाऊंट काढून अश्लील संदेश पाठवण्यात आले. त्यानंतर तिला सोशल मीडियावर अश्लील फोटो पाठविण्याची धमकी देणाऱ्यास सायबर सायबर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. सुदर्शन सुनील जाधव (वय २५ वर्षे, रा. मेदनकरवाडी, आळंदी फाटा, चाकण) असे त्याचे नाव आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाने चिखली पोलिस ठाणे हद्दीतील २० वर्षीय महिलेच्या नावाने एआयचा वापर करून तिच्या फोटोचा गैरवापर करून बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्यावरून वेळोवेळी अश्लील संदेश पाठवले. तसेच एआयचा वापर करून तिचे अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेने तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन त्यास अटक करण्यासाठी सायबर पोलिस ठाण्यास तपास करण्यासाठी आदेश दिले.
सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण नाळे यांनी प्रवीण स्वामी, प्रकाश कातकाडे, पोलिस अंमलदार वैशाली बर्गे, हेमंत खरात, सुभाष पाटील, प्रवीण शेळकंदे, स्वप्नील खणसे यांचे पथक तयार केले. त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, मोबाइल कंपन्यांना पत्रव्यवहार करून माहिती घेतली. माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यामध्ये प्राप्त झालेल्या संशयित मोबाइल नंबरधारकाकडे तपास केला. या कालावधीमध्ये त्याचा मोबाइल गहाळ झाला असल्याची व त्याबाबत तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर आली. त्याअनुषंगाने अधिक तपास केला. गुन्ह्यासाठी संशयिताने वापरलेले फेक इन्स्टाग्राम आयडीचे आयपी मिळाले व त्यामधून मोबाइल नंबर मिळवून तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला.
चाकण येथून संशयित सुदर्शन जाधव यास ताब्यात घेण्यात आले. त्याने सापडलेल्या मोबाइलचा व सीमचा वापर करूनच एआय ॲप्लिकेशनचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी महिला संशयित कामास असलेल्या कंपनीतील असल्याने त्याने चोरून तिचे फोटो व माहिती मिळवून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.