पिंपरी : एका व्यक्तीची ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली १५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाली. ही घटना २३ नोव्हेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ या कालावधीत दिघी येथे ऑनलाइन माध्यमातून घडली.
याप्रकरणी संदीप सुभाष शर्मा (४९, रा. विजयनगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप शर्मा हे एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर ‘आर्या आनंद’ नावाच्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला.
तिच्या सल्ल्यानुसार, शर्मा यांनी विविध बँक खात्यांमध्ये एकूण १५ लाख ३३ हजार रुपये जमा केले. सुरुवातीला त्यांना ॲपमध्ये एक कोटी २१ लाख रुपयांचा नफा दिसला. मात्र, जेव्हा त्यांनी हा नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना तो ब्लॉक झाल्याचे दिसले. संशयिताने नफा काढण्यासाठी २४ लाख २२ हजार २७९ रुपये सेवा शुल्क भरण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगताच संशयितांनी त्यांच्याशी संपर्क करणे बंद केले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.