पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमध्ये ऑनलाइन पेमेंटद्वारे तिकीट काढल्यावर प्रवाशांचा मोबाइल नंबर, यूपीआय आयडी (व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस) छापून येत आहेत. प्रवाशांची वैयक्तिक माहिती उघड होत असल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने यूपीआय आयडी पूर्ण किंवा शेवटचे काही नंबर प्रसिद्ध न करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
केंद्र सरकारकडून डिजिटल इंडियाच्या माध्यमातून डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. पीएमपी प्रशासनानेही मागील वर्षी एक ऑक्टोबर रोजी ‘पुणे दर्शन’च्या दोन बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन पेमेंटद्वारे तिकीट काढण्याची सुविधा सुरू केली होती. त्यानंतर ही सुविधा सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. प्रवाशांना तिकीट मशीनवरील कोड स्कॅन करून ‘गूगल पे’ किंवा ‘फोन पे’ने तिकिटाचे पैसे जमा करता येत आहेत.या सुविधेमुळे बसमध्ये सुट्या पैशांवरून होणारे वाद कमी होतील आणि प्रवाशांना रोख पैसे ठेवण्याची चिंता मिटेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मशीनमधील अनेक त्रुटींमुळेच ही सेवा जास्त चर्चेत राहिली. ‘खात्यातून पैसे जातात; पण मशीनमधून तिकीटच येईना’, ‘मशीन खराब आहे’, ‘नेटवर्क नाही’ अशा विविध कारणांमुळे प्रवाशांबरोबरच वाहकही हवालदिल झाले आहेत. आता तर तिकिटावर प्रवाशांचा ‘यूपीआय आयडी’ छापून येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
‘पीएमपी’तून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांमध्ये महिला आणि विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ‘पीएमपीएमएल’ने ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू केल्यानंतर आता बहुतांश प्रवासी ऑनलाइन पेमेंट करताना दिसून येत आहेत. ऑनलाइन पेमेंटद्वारे काढलेल्या तिकिटावर संबंधित प्रवाशाचा ‘यूपीआय आयडी’ छापून येत आहे. अनेक प्रवाशांचा ‘यूपीआय आयडी’ हा त्यांचा मोबाइल नंबर आहे. प्रवासानंतर प्रवासी तिकीट न फाडता फेकून देतात. त्यामुळे त्या तिकिटावरील माहिताचा गैरवापर होण्याची शंका प्रवासी व्यक्त करत आहेत.
तांत्रिक टीमबरोबर चर्चा करून शक्य असल्यास तिकिटावरील यूपीआय आयडी पूर्ण किंवा काही अंक ‘हाइड’ करण्यात येतील. प्रवाशांनी कोणतीही भीती न बाळगता ऑनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करावा. - दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ‘पीएमपीएमएल’