पादचारी पुलाचे कोटींचे ‘उड्डाण’
By Admin | Updated: March 5, 2016 01:01 IST2016-03-05T01:01:46+5:302016-03-05T01:01:46+5:30
उड्डाणपुलांच्या वाढीव खर्चाचे ‘उड्डाण’ घेण्यावरून नेहमीच चर्चेत असलेल्या महापालिकेने भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाबाबत तर ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी केली आहे.

पादचारी पुलाचे कोटींचे ‘उड्डाण’
पिंपरी : उड्डाणपुलांच्या वाढीव खर्चाचे ‘उड्डाण’ घेण्यावरून नेहमीच चर्चेत असलेल्या महापालिकेने भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाबाबत तर ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी केली आहे. ७१ लाखांचा पूल तब्बल साडेसात कोटींवर पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भोसरीतील शीतलबाग येथे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल उभारण्यात येत आहे. मात्र, या पुलाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. अवघ्या साडेतीन वर्षांत हा पूल साडेसात कोटींवर पोहोचला आहे.
बांधकाम साहित्यात वाढ झाल्याच्या नावाखाली विविध कामांमध्ये वाढीव खर्चाची ‘उडी’ घेणाऱ्या महापालिकेचा वाढीव खर्चाचा सपाटा सुरू आहे. महापालिकेची बहुतेक कामे ही विविध कारणांनी खर्चाच्या बाबतीत फुगत जात आहेत. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर भार पडत आहे. भोसरीतील पीएमटी चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शीतलबाग ते धावडेवस्तीदरम्यान एक किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला. यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला. मात्र, शीतलबाग येथे उड्डाणपूल संपल्यानंतर तीव्र उतार आहे. उतार आणि उड्डाणपुलावरून येणारी भरधाव वाहने यामुळे छोटे-मोठे अपघात घडतात. उड्डाणपुलामुळे रस्ता प्रचंड रुंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागायची. ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे पादचारी पूल उभारण्याबाबत मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शीतलबाग येथे पादचारी पूल उभारण्याचा निर्णय आॅगस्ट २०१२मध्ये घेतला. या पुलासाठी आॅनलाइन निविदा मागविण्यात आल्या होत्या. या कामासाठी ७१ लाख ५ हजार इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. केवळ पादचारी पुलासाठी पाऊण कोटीच्या खर्चाबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते. एका वर्षाच्या आत पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते.
मात्र, पुलाचे काम रखडले. दरम्यान, भोसरीतील स्थानिक नगरसेवक स्थायी समितीचे सभापती झाल्यानंतर दोन वर्षांपासून रखडलेले पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा तयारी सुरू झाली. आॅगस्ट २०१४मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते. त्यानंतर या कामासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार तब्बल पाच कोटी ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. म्हणजेच आॅगस्ट २०१२मध्ये या पुलासाठी अपेक्षित धरण्यात आलेला ७१ लाखांचा खर्च आॅगस्ट २०१४मध्ये ५ कोटी ३५ लाखांवर पोहोचला. दोन वर्षांत या पुलाचा खर्च साडेसात पटीने वाढला. (प्रतिनिधी)