पिंपरी : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेनजीक असलेल्या गोंडोला या उंच ठिकाणी असताना अचानक सैन्याने गोंडोला येथून खाली उतरण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले. तेवढ्यात कळाले की, पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ला झालेल्या बैसरन व्हॅलीत आदल्याच दिवशी आम्ही सहकुटुंब गेलो होतो. त्यामुळे क्षणातच अक्षरश: सर्वांगाचा थरकाप उडाला, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे पिंपरी-चिंचवड शहर युवा अधिकारी चेतन पवार यांनी ‘आपबीती’ सांगितली.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील काही नागरिक अडकले. शिवसेनेचे चेतन पवार पत्नी आणि दोन मुलांसमवेत जम्मू-काश्मीर फिरण्यासाठी गेले आहेत. त्यांचा १२ जणांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये पिंपरी-चिंचवडमधून पवार यांचेच कुटुंब आहे. पवार यांनी काश्मीरमध्ये अनेक ठिकाणे पाहिली.
चेतन पवार म्हणाले, सोमवारी आम्ही बैसरन व्हॅलीत गेलो. मात्र, त्यापूर्वी तेथे जोरदार पाऊस झाल्याने अनेक पर्यटकांनी व्हॅलीच्या उंच ठिकाणी जाण्याचे टाळले. त्यामुळे तेथे तुरळक गर्दी होती. मात्र, आम्ही पावणेदोन तास घाेडेस्वारी करत बैसरनच्या उंच ठिकाणी पोहोचलो. तेथील निसर्गाचा आणि वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर आम्ही मंगळवारी गुलमर्ग येथील गोंडोला येथे पोहोचलो. आम्ही गोंडोलाच्या उंच ठिकाणी फिरण्याचा आनंद घेत होतो. त्यावेळी सैन्याने सूचना केली. सर्वांनी त्वरित खाली सुरक्षित ठिकाणी जा, असे सांगून पर्यटकांना खाली उतरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे आम्ही सर्वजण गोंधळलो.
नेमके काय झाले, हे समजत नव्हते. मात्र, काळी वेळातच माहिती मिळाली की, आम्ही ज्या बैसरन व्हॅलीत एक दिवस आधी आनंद घेतला त्याच ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. काही पर्यटकांचा त्यात मृत्यू तर काहीजण जखमी झाल्याचे समजले. त्यामुळे आम्ही नि:शब्द झालो. कालवाकालव होऊन मनात काहूर माजले.
गोंडोला येथून सैन्याने आम्हाला खाली सुरक्षित ठिकाणी नेले. स्थानिकांनीही मोठा धीर देत विमानतळावर जाण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले. या हल्ल्याचा स्थानिकांनी निषेध केला. स्थानिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. तसेच सुरक्षा यंत्रणांनीही बंदोबस्त वाढवला. त्यामुळे श्रीनगरमध्ये संचारबंदी दिसून येत होती. यावरून परिस्थिती अतिशय गंभीर असून सर्व चित्र भयावह असल्याचे दिसून आले.