चिंचवडला आर्थिक वादातून एकाचा खून
By नारायण बडगुजर | Updated: February 19, 2024 21:50 IST2024-02-19T21:50:16+5:302024-02-19T21:50:29+5:30
सतत व्यसन केल्याने तो घरी जात नव्हता.

चिंचवडला आर्थिक वादातून एकाचा खून
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून शस्त्राने वार करत एका व्यक्तीचा खून केला. चिंचवड येथील नागसेननगर झोपडपट्टीत सोमवारी (दि. १९) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली.
प्रकाश मारुती म्हेत्रे (४०, रा. बिजलीनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी कमलकिशोर रमेश भट (४०, रा. उत्तराखंड) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हा व्यसनांच्या आहारी गेला होता. तसेच सतत व्यसन केल्याने तो घरी जात नव्हता.
दरम्यान, प्रकाश आणि कमलकिशोर यांच्यामध्ये पैशांच्या देवाण घेवाणीवरून सोमवारी सायंकाळी वाद झाला. त्या कारणावरून कमलकिशोर याने प्रकाश याच्यावर हत्याराने वार केले. त्यामध्ये प्रकाश गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.