वा रे बहाद्दर ! नव्यानेच झालेल्या रस्त्यांवर पुन्हा खोदाई; महापालिकेच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 26, 2024 17:09 IST2024-12-26T17:08:42+5:302024-12-26T17:09:17+5:30
नव्याने बनवलेले रस्ते खोदले जातात. या कामामुळे जनतेचा पैसा, प्रशासनाचा वेळ वाया जातो.

वा रे बहाद्दर ! नव्यानेच झालेल्या रस्त्यांवर पुन्हा खोदाई; महापालिकेच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव
पिंपरी : महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून, तसेच स्मार्ट सिटीकडून अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू आहे. काही भागातील कामे पूर्ण होत आली आहेत; पण जेथे रस्त्यांची कामे झाली आहेत, तेथेच पाणीपुरवठा, जलनिस्सारण व पथविभागाकडून पुन्हा रस्ता खोदला जात आहे. त्यामुळे रस्ता खराब होत असून, कामासाठीच्या निधीचाही अपव्यय होतो. या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने असे प्रकार सुरू आहेत.
शहरातील विविध भागामध्ये स्मार्ट सिटीकडून रस्त्याची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर महापालिकेकडून जलवाहिनी, जलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे कामही सुरू आहे. यामध्ये महापालिका-स्मार्ट सिटी व सर्व विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. समन्वय नसल्यामुळे, नव्याने बनवलेले रस्ते खोदले जातात. या कामामुळे जनतेचा पैसा, प्रशासनाचा वेळ वाया जातो.
वारंवार होते खोदाई
महापालिका कंत्राटदारामार्फत रस्ता तयार करते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच कधी जलवाहिनीसाठी, कधी नैसर्गिक वायूसाठी, तर कधी वीज वाहिनीसाठी अशी वारंवार खोदाई होत राहते. सर्व विभागांचा महापालिकेशी समन्वयाचा अभाव याला कारणीभूत आहे. समन्वयाच्या अभावामुळेच रस्त्याचा दर्जा घसरतो, तयार रस्ता खोदला जातो. मग त्यासाठी पुन्हा नवी निविदा काढली जाते.
जेसीबीच कशासाठी?
पूर्वी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी जिथे गळती वा काही अडचण असेल तिथे खोदाई करायचे; पण आता जेसीबी बोलवला जातो, त्याने मोठा खड्डा केला जातो. त्यावेळी आजूबाजूचे पाइप तसेच टेलिफोनच्या केबल तुटतात. त्याचा भुर्दंड वेगळाच असतो. ब्रेकरसारखी साधने असल्याने हवी तितकी व इतर सुविधांना धक्का न पोहोचवता खोदाई केली जाऊ शकते. त्याबाबतही महापालिकेने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये समन्वय आहे. ज्या रस्त्यांचे काम करण्यात येणार असेल, तर त्याआधी संबंधित सर्व विभागांना काम करून घेण्याच्या सूचना देण्यात येतात. काही वेळेस अपरिहार्य कारणांमुळे ऐनवेळी काही खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी लागते. त्यामुळे रस्ता खोदाई करावी लागते. - मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका