नदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांना नोटीस
By Admin | Updated: September 23, 2015 03:22 IST2015-09-23T03:22:18+5:302015-09-23T03:22:18+5:30
पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नद्यांमध्ये प्रक्रिया न करता दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांना नोटीस बजावण्याचे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम

नदीत दूषित पाणी सोडणाऱ्यांना नोटीस
पिंपरी : पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नद्यांमध्ये प्रक्रिया न करता दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांना नोटीस बजावण्याचे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला मंगळवारी दिले. तसेच झोपडपट्ट्यांमुळे नद्यांचे प्रदूषण होऊ नये याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेने दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत अन्यथा महापालिकेलाही नोटीस बजावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने पवना नदीसुधार आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पाच्या विविध मुद्द्यांबाबत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी मुंबईत बैठक घेतली. बैठकीस पालकमंत्री गिरीश बापट, महापौर शकुंतला धराडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अॅड. गौतम चाबुकस्वार, आयुक्त राजीव जाधव आदी उपस्थित होते. नदीपात्रालगत वसलेल्या झोपडपट्ट्यांमुळेही नद्यांचे प्रदूषण होत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. त्यावर कदम यांनी झोपडपट्ट्यांमुळे नद्यांचे होणारे प्रदूषण तातडीने थांबविण्याबाबत दक्षता घेण्यासंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या. (प्रतिनिधी)