मायबोलीला आयुष्यात कधीही विसरू नका
By Admin | Updated: January 26, 2017 00:10 IST2017-01-26T00:10:21+5:302017-01-26T00:10:21+5:30
जन्म देणारी आई, जन्माबरोबर शिकलेली मातृभाषा आणि ज्या मातीवर आपण वाढलो-घडलो ती माती यांची महिती अनंत असून,

मायबोलीला आयुष्यात कधीही विसरू नका
वाकड : जन्म देणारी आई, जन्माबरोबर शिकलेली मातृभाषा आणि ज्या मातीवर आपण वाढलो-घडलो ती माती यांची महिती अनंत असून, त्यांना आयुष्यात कधीही विसरू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक राज अहिरराव यांनी विद्यार्थ्यांना केले.
येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयात आयोजित माय मराठी साहित्य उत्सवात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी लेखक व कवी नंदकुमार मोरडे, कवयित्री प्रमिला इंगळे, शालेय समिती अध्यक्ष नितीन बारणे, मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, मुख्याध्यापक नटराज जगताप यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे अहिरराव व नाटककार उज्ज्वला केळकर यांनी ऋणानुबंध कथेतून जन्म ते मृत्यू या प्रवासातील आयुष्याचे विविध रूपे उलगडून दाखविली व याबरोबर समाजात जपले जाणारे प्रेम त्या संसारिक जीवनातील प्रसंगांना सामोरे जाताना लाभलेली साथ, यात बदलणारी माणसे, त्यांचे स्वभाव यावर विनोद करत आयुष्याचे गणित अभिवादन कथेतून अगदी हुबेहूब सादर करीत विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले.
समर्पक भाषा, सादरीकरणातील चढ-उतार, देहबोली, शब्दफेक, कारुण्य-चैतन्य अशा विविध आविष्कारांनी आपल्या कथेतून राज अहिरराव यांनी मुलांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन अंजली सुमंत, प्रास्ताविक विजय पारधी यांनी केले, तर आभार सुनीता घोडे-सलगर यांनी मानले. (वार्ताहर)