सुश्राव्य गायन, बहारदार नृत्य
By Admin | Updated: February 1, 2016 00:32 IST2016-02-01T00:32:42+5:302016-02-01T00:32:42+5:30
कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कलाश्री संगीत विद्यालय आणि राधानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन, वादन आणि नृत्याने झाली.

सुश्राव्य गायन, बहारदार नृत्य
पिंपळे गुरव : कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कलाश्री संगीत विद्यालय आणि राधानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन, वादन आणि नृत्याने झाली.
कार्यक्रमाच्या प्रथम पुष्पामध्ये पंडित सुधाकर चव्हाण यांचे शिष्य रवींद्र दामले यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग भीमपलासीमध्ये विलंबित एक तालात ‘अब तो बडी बेर’ ही बंदीश, तर द्रुत त्रितालात ‘जा जा रे अपने मंदिरावा’ ही बंदीश सादर केली.
त्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा ‘पद्मनाभा नारायणा’ हा अभंग सादर केला. त्यांना हार्मोनियमवर प्रभाकर पांडव, तबल्यावर रोहिदास कुलकर्णी, पखवाजवर शशिकांत भोसले, तानपुऱ्यावर साथ हरीष सुळे व अतुल गायकवाड आणि टाळासाठी सर्वेश बादरायणी यांनी केली.
द्वितीय पुष्पामध्ये स्वरभास्कर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी राग पुरिया कल्याणमध्ये विलंबित एकतालात ‘आज सोबना’ ही बंदीश, तर द्रुत त्रितालात ‘बहुत दिन’ ही बंदीश सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
त्यांनी गायनाची सांगता संत ज्ञानदेव महाराजांच्या ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ या अभंगाने केली.
त्यांना संवादिनीवर साथ अविनाश दिघे, तबलासाथ प्रशांत पांडव, तानपुऱ्यावर साथ हरीष सुळे व अतुल गायकवाड आणि टाळासाठी माऊली टाकळकर यांनी केली.
पुष्पामध्ये पं. बिरजूमहाराज यांच्या नात व शिष्या प्रसिद्ध कथक नृत्यांगना रागिणीमहाराज यांनी आपली कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी प्रथम बिरजूमहाराजरचित कृष्ण वंदना सादर केली. त्यानंतर त्यांनी त्रितालमध्ये थाट, गत व परण सादर केली. त्यानंतर त्यांनी धमाल तालामध्ये काही रचना पेश केल्या.
त्यांना तबल्यावर साथ आशिष मिश्रा, गायन व हार्मोनियम वारीश खान, पढंत रागिणीमहाराज यांच्या गुरू, विदुषी ममतामहाराज, सतारवर अपर्णा देवधर आणि बासरीसाठी रोहित बनकर यांनी केली. त्यांना दाद दिली. नामदेव तळपे यांनी सूत्रसंचालकन केले.
अंतिम व चतुर्थ पुष्प पंडित राजा काळे यांच्या गायनाने झाले. त्यांनी प्रथम राग झिंझोटीमध्ये विलंबित एकतालात ‘सावरो मन भायो’ ही, तर द्रुततालामध्ये ‘आओ जी सखी आओ’ ही बंदीश सादर केली. त्यानंतर त्यांनी ‘सुरत पिया की छिन’ हे नाट्यगीत सादर केले. यानंतर त्यांनी ‘विठाई सावळे डोळस रंगा येई वो’ हा अभंग केला. शेवटी त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांची अजरामर रचना ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हा अभंग व त्यानंतर ‘परब्रह्म भेटीलागी’ हा अभंग सादर केला.
त्यांना संवादिनीवर साथ श्याम जोशी, तबल्यावर प्रशांत पांडव, तानपुऱ्यावर साथ कल्याणी भोसले व योगिनी ढगे यांनी केली. बहारदार महोत्सवाची सांगता झाली. (प्रतिनिधी)