Pimpri Chinchwad: एमआयडीसी, सांगवीत दहशत पसरविणाऱ्या पवार टोळीवर मोक्का
By नारायण बडगुजर | Updated: April 18, 2024 15:44 IST2024-04-18T15:44:12+5:302024-04-18T15:44:51+5:30
जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील नऊ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ४४ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ लावण्यात आला....

Pimpri Chinchwad: एमआयडीसी, सांगवीत दहशत पसरविणाऱ्या पवार टोळीवर मोक्का
पिंपरी : महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुल पवार टोळीवर ‘मोक्का’ लावण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील नऊ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ४४ गुन्हेगारांवर ‘मोक्का’ लावण्यात आला.
टोळी प्रमुख राहुल संजय पवार (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), अमर नामदेव शिंदे (२८, रा. कासार आंबोली, ता. मुळशी), नितीन पोपट तांबे (३४, रा. मोशी), अभिजित ऊर्फ अभी चिंतामण मराठे (रा. जयभवानीनगर, कोथरूड), आसिफ ऊर्फ आशू हैदर हाफशी (रा. कासारवाडी), अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत. टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारांवर सात गुन्हे दाखल आहेत.
टोळी प्रमुख राहुल पवार व त्याच्या साथीदारांनी महाळुंगे एमआयडीसी, चाकण, एमआयडीसी भोसरी, सांगवी, पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे, असे गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्काअतंर्गत कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. कागदपत्रांची छाननी करून ‘मोक्का’ कारवाईचे आदेश अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी पारित केले.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, परिमंडळ तीनचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते, पोलिस निरीक्षक अनिल देवडे, पोलिस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, राजेंद्र कोणकेरी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.