मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल आस्था, पण - शरद पवार
By Admin | Updated: January 17, 2016 15:35 IST2016-01-17T15:28:38+5:302016-01-17T15:35:43+5:30
मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल आस्था आहे पण पुढच्या पिढीला मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा त्याचा आग्रह सुध्दा आहे.

मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल आस्था, पण - शरद पवार
ऑनलाइन लोकमत
पिंपरी - चिंचवड, दि. १७ - मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल आस्था आहे पण पुढच्या पिढीला मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा त्याचा आग्रह सुध्दा आहे. आपण आपल्या मुलांना भले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातलं तरी, तिथे मातृभाषा मराठी शिकवली जाईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. इंग्रजीच्या बरोबरीने मातृभाषा शिकण्याची संधी असलेल्या शैक्षणिक संस्थेला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, अन्यथा मातृभाषेवर विपरित परिणाम झाल्याशिवाय रहाणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८९ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात बोलताना व्यक्त केले.
नवीन पिढी मातृभाषेचा कितपत स्वीकार करणार ते अत्यंत महत्वाच आहे. नव्या पिढीला मातृभाषेची गोडी लागावी यासाठी आपल्याला घरापासून धोरणात्मक निर्णय घेणा-यांपर्यंत खबरदारी घेतली पाहिजे असे शरद पवार म्हणाले.
८९ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या तिस-या दिवशी आज शरद पवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. काँग्रेसचे नेते उल्हासदादा पवार, कवी फ.मु.शिंदे आणि प्रा.जनार्दन वाघमारे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. त्यावेळी मराठी भाषेच्या भवितव्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवारांनी आपली ही भूमिका मांडली. शरद पवारांनी या मुलाखतीत मराठी भाषेबरोबरच, राजकारण, स्वतंत्र विदर्भ, साहित्या संबंधीच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.