बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलेंडरची टाकी डोक्यात घालून मित्राचा खून
By नारायण बडगुजर | Updated: December 15, 2024 23:06 IST2024-12-15T23:06:39+5:302024-12-15T23:06:53+5:30
Pimpri Crime News: बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलींडरची टाकी डोक्यात घालून सहकारी मित्राचा खून केला. दिघी येथे रविवारी (दि. १५) दुपारी ही घटना घडली.

बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलेंडरची टाकी डोक्यात घालून मित्राचा खून
- नारायण बडगुजर
पिंपरी - बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलींडरची टाकी डोक्यात घालून सहकारी मित्राचा खून केला. दिघी येथे रविवारी (दि. १५) दुपारी ही घटना घडली. संतोष शंकर खंदारे (४५, रा. दिघी रोड, मुळ रा. वाशिम) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. गणेश दिगंबर खंडारे (रा. दिघी, मुळ रा. वाशिम) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष खंदारे तीन महिन्यांपूर्वी कामानिमित्त गावावरून दिघी येथे राहण्यास आले होते. संतोष खंदारे आणि गणेश खंडारे दोघेही बांधकाम साइटवर मिस्त्रीचे काम करत होते. रविवारी (दि. १५) सुट्टी असल्याने दोघेही घरी होते. त्यामुळे त्यांनी बिर्याणी बनवण्याचा बेत आखला. गणेश खंडारे याने बिर्याणी बनवली. मात्र ती चांगली झाली नाही, असे म्हणत संतोष खंदारे यांनी गणेश खंडारे याच्याशी वाद घातला. त्यावरून दोघांच्यात हाणामारी झाली. यावेळी गणेश खंडारे याने संतोष खंदारे यांच्या डोक्यात गॅस सिलींडरची टाकी घातली. यामध्ये संतोष खंदारे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे तपास करीत आहेत.