पिंपरी : शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येतात.यासाठी अग्निशमन विभागात १५० फायरमनची सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागवून लेखी परीक्षाही महापालिकेने घेतली आहे. मात्र, मैदानी चाचणीअभावी या भरतीला खोडा बसला आहे. लेखीमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार मैदानी चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत.शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. नियमाप्रमाणे लोकसंख्येनुसार शहरामध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत. लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर ताण येत आहे.अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाजामधील अधिकारी, कर्मचारी वगळता सहा लिडिंग फायरमन, तर फक्त ३० फायरमन कार्यरत आहेत. भविष्यात पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह दहा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे. त्यासाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षाही दिली. या परीक्षेत पास झालेल्यांना मैदानी चाचणीची प्रतीक्षा आहे.
अग्निशमन विभागातील फायरमनची लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे. त्यात पात्र झालेल्या उमेदवारांची जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. - विठ्ठल जोशी, उपायुक्त, महापालिका