Chinchwad Byelection Result: चिंचवडमधे पुन्हा 'कमळ'; अश्विनी जगताप विजयी; राहुल कलाटेंच्या बंडखोरीने नानांच्या मार्गात 'काटे'!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:10 PM2023-03-02T18:10:11+5:302023-03-02T18:15:13+5:30

चिंचवडच्या तिरंगी लढतीत अश्विनी जगताप यांचा विजय, राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फायदा भाजपला

'Lotus' again in Chinchwad; Ashwini Jagtap wins; Rahul Kalat's rebellion 'thorns' in Nana's path! | Chinchwad Byelection Result: चिंचवडमधे पुन्हा 'कमळ'; अश्विनी जगताप विजयी; राहुल कलाटेंच्या बंडखोरीने नानांच्या मार्गात 'काटे'!

Chinchwad Byelection Result: चिंचवडमधे पुन्हा 'कमळ'; अश्विनी जगताप विजयी; राहुल कलाटेंच्या बंडखोरीने नानांच्या मार्गात 'काटे'!

googlenewsNext

पिंपरी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज झाली. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. तर चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी अजून सुरू होती. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. भारतीय जनता पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी अशी काटे की टक्कर झाली. महाविकास आघाडीतील काटे-कलाटे मत विभागणीचा फायदा भाजपला झाला असून चिंचवडमध्ये ३७ व्या फेरीअखेर भाजपच्या आश्विनी जगताप या तब्बल ३६ हजार १६८ मतांच्या फरकाने १ लाख ३५ हजार ४३४ मते मिळवून विजयी झाल्या आहेत.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नाना काटे आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह २८ उमेदवार रिंगणात होते. चिंचवड मधील एकूण ५ लाख ६७ हजार ९५४ मतदारांपैकी २ लाख ८७ हजार ४८९ नागरिक यांनी मतदान केले. पोटनिवडणुकमध्ये ५०.५३ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. सुट्टीचा दिवस असल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.

चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या नाना काटे आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत दिसून आली.  एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदारांपैकी २ लाख ८७ हजार १४५ जणांनी असे एकूण ५०.४७ टक्के इतके सरासरी मतदान झाले. त्यामध्ये अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला असून नाना काटे यांना ९९ हजार ३४३ यांना राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते मिळाली आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. एका मतदार संघाची ही पोटनिवडणूक नव्हती तर राज्यातील सत्तासंघर्ष आणि सत्तावर्चस्वाची प्रचिती देणारी निवडणूक होती. महायुती आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. महायुतीचे चाळीस आणि महाविकास आघाडीचे २० हून अधिक स्टार प्रचारक, राज्यातील आमदार खासदार, मंत्री, माजी मंत्री या मतदार संघात तळ ठोकून होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून येत होते.

राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका नाना काटेंना 

भाजपा महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या नाना काटे आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे या तिरंगी लढतीत काटे यांना मोठा फटका बसला आहे. राहुल कलाटे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे चिंचवडमधील मतांचे विभाजन झाल्याचे फेऱ्यांमधून दिसून आले. त्यामुळे राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा काटे यांना जबरदस्त फटका बसल्याचे या पोटनिवडणुकीत स्पष्ट झाले आहे. 

स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करणार 

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या कामांची पावती मतदारांनी दिलेली आहे. भारतीय जनता पक्षासह महायुतीतील सर्व पक्षांनी कार्यकर्त्यांनी काम केले. विजयाचे श्रेय पक्षातील कार्यकर्त्यांना आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना आहे. मतदारसंघातील प्रलंबित राहिलेली कामे मी पूर्ण करणार आहे. शास्तीकर माफी, अनधिकृत बांधकामे नियमित करणे, तसेच रावेत किवळे भागाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याचे अश्विनी जगताप यांनी सांगितले आहे. 

Web Title: 'Lotus' again in Chinchwad; Ashwini Jagtap wins; Rahul Kalat's rebellion 'thorns' in Nana's path!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.