पिंपरी चिंचवड : भारतीय रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले असल्याचे सांगण्यात येत आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. मात्र, पीएमसीकडून ही माहिती देण्यात आल्यावर पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक येथील बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी खातेदारांनी सकाळपासून धाव घेतली. बँकेच्या परिसरातील वातावरण चिंताग्रस्त होते. बँकेत नागरिकांचे पैसे अडकले आहेत. पैसे भेटत नसल्याने खातेदार त्रस्त झाले आहेत.
निर्बंधकाळात बँकेला कर्मचायांचे पगार, दैनंदिन खर्च, शाखांच्या जागांचे भाडे यासाठी रक्कम खर्च करता येईल. कायदेशीर खचार्साठीही ठरावीक मयार्देपर्यंतच रक्कम खर्च करता येईल. दरम्यान, हे निर्बंध सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असून, त्यानंतर रिझर्व्ह बँक पीएमसी बँकेबाबत पुढील निर्णय घेईल.
यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी पीएमसी बँकेचे संचालक जॉय थॉमस यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर काही निर्बंध घातले आहेत. बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुढील सहा महिन्याच्या आत अनियमितेमधील या त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पुढील सहा महिन्यात या त्रुटी दूर करून बँक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच या काळात ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त करून बँकेला सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली आहे.