पिंपरी : सार्वजनिक रहिवासी सोसायट्यामंधील अनधिकृत ‘क्लाऊड किचन’वर महापालिकेने कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. महापालिकेच्या वतीने यांच्या व्यावसायिक नोंदी, ध्वनिप्रदूषण आणि परवाने तपासण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे सार्वजनिक रहिवासी सोसायट्यांना दिलासा मिळणार आहे
याबाबत लोकमतने पाहणी करत ‘रहिवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत क्लाऊड किचनची वाढली डोकेदुखी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेत यावर तत्काळ शहरातील क्लाऊड किचन सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
परवाने आणि नोंदींची घेणार माहिती...
शहरातील सर्व रहिवासी सोसायट्यांमध्ये सुरू असलेल्या क्लाऊड किचनच्या नोंदी आणि परवान्यांची सखोल तपासणी केली जाणार आहे. यांच्याकडे आवश्यक व्यावसायिक परवाने, ध्वनिप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रे आहेत का? याचीही तपासणी करण्यात येणार असून, ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
क्लाऊड किचनची सांगवी परिसरातील तक्रार होती. त्या ठिकाणी पथकाने पाहणी केल्यानंतर ध्वनी व वायुप्रदूषण होत असल्याचे आढळून आले. त्याबाबत संबंधितांना नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमधील व्यावसायिक आस्थापनांची माहिती कर संकलन विभागाकडून मागविली आहे. - हरविंदरसिंग बन्सल, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका