अभ्यासिकेतून स्वावलंबनाचे धडे
By Admin | Updated: March 8, 2016 01:03 IST2016-03-08T01:03:42+5:302016-03-08T01:03:42+5:30
शहरातील प्रामुख्याने झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी सेवा सहयोगी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

अभ्यासिकेतून स्वावलंबनाचे धडे
नीलेश जंगम, पिंपरी
शहरातील प्रामुख्याने झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी सेवा सहयोगी संस्थेने पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक झोपडपट्टीमध्ये खोली भाड्याने घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावा म्हणून व्यावसायिक प्रशिक्षणाचे धड दिले जात आहेत.
खासगी शिकवणी लावणे सर्वच मुलांना परवडत नाही. झोपडपट्टीतील मुलांसाठी तर ही अशक्य गोष्ट आहे. त्यांनाही चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून सेवा सहयोग संस्थेतर्फे मोफत अभ्यासिका उपक्रम तीन वर्षांपूर्वी सुरू केला होता. त्याची सुरवात पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यानगर, ओटास्कीम, गांधीनगर, फुलेनगर, काळेवाडी, थेरगाव या झोपडपट्टी भागात करण्यात आली. रोज सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत अभ्यासिका घेतली जाते. सुरुवातीला अवघे ५० विद्यार्थ्यांपासून अभ्यासिका सुरू करण्यात आली. आतापर्यंत तब्बल ४००० विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेतला आहे.
पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन बॅचमध्ये अभ्यासिकेबरोबर विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क वाढवून त्यातून त्यांना आरोग्य, स्वच्छता व स्वावलंबनाचे धडे दिले जात आहेत. त्यासाठी विविध विषयांतील तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी बोलविले जाते.
या झोपडपट्टी व वसाहतीतील उच्चशिक्षित महाविद्यालयीन तरुणांना शिक्षक म्हणून प्राधान्याने संधी दिली जाते. प्रत्येक अभ्यासिकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थने एक समन्वयक नेमला आहे. वर्षातून तीन वेळा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. मुलांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी दर वर्षी सहलीचे व विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक अभ्यासिकेत व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्यासाठी ३५० पुस्तके ठेवण्यात आली आहेत. ग्रंथालयासोबतच विज्ञान उपक्रमांवरही संस्थेच्या माध्यमातून भर दिला जातो. यासोबतच प्रत्येक अभ्यासिका केंद्रावर संगणक प्रशिक्षण देण्यासाठी एक संगणक उपलब्ध केला आहे. विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे प्रशिक्षणही दिले जाते. दिवाळीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा महोत्सव घेतला जातो.