भोसरीतील कंपनीत क्लोरीन वायूची गळती; अग्निशामक दलाच्या १७ जवानांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 21:36 IST2021-09-08T21:35:30+5:302021-09-08T21:36:29+5:30
भोसरी एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक २१२, सेक्टर क्रमांक १०, गवळी माथा येथील सत्यसाई एन्टरप्रायजेस या कंपनीमध्ये क्लोरिन वायूची गळती झाल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली.

भोसरीतील कंपनीत क्लोरीन वायूची गळती; अग्निशामक दलाच्या १७ जवानांना बाधा
पिंपरी : क्लोरिन वायूची सिलेंडरमधून गळती झाली. ही गळती बंद करीत असताना अग्निशामक दलाच्या १७ जवानांना बाधा झाली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. भोसरी एमआयडीसीत बुधवारी (दि. ८) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक २१२, सेक्टर क्रमांक १०, गवळी माथा येथील सत्यसाई एन्टरप्रायजेस या कंपनीमध्ये क्लोरिन वायूची गळती झाल्याची माहिती बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाच्या पिंपरी मुख्यालय आणि भोसरी अग्निशामक उपकेंद्रातील एक, असे दोन बंब तसेच एमआयडीसीच्या अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. कंपनीत जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारा क्लोरीन वायूचे काही सिलेंडर होते. त्यातील एक सिलेंडरमधून गळती होत होती. क्लोरीन वायू पाण्यात मिसळणारा असल्याने गळती होणारा सिलेंडर पाण्याच्या ड्रममध्ये टाकण्यासाठी उचलण्यात आला. त्यावेळी सिलेंडरच्या खालच्या बाजून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे समोर आले. सिलेंडर पाण्यात टाकल्यानंतरही दाब जास्त असल्याने वायू पाण्यात न मिसळता बाहेर येत होता. त्यामुळे अग्निशामक दलाच्या १७ जवानांना खाज तसेच खोकल्याचा त्रास जाणवण्यास सुरवात झाली. अडीच तासानंतर गळती थांबविण्यात यश आले. वायूमुळे त्रास होत असलेल्या जवानांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर संबंधित जवांनाना सोडून देण्यात आले.
जलशुद्धीकरणासाठी होतो क्लोरीनचा वापर
क्लोरीन वायू पाण्यात सहज विरघळतो. जलशुद्धीकरण तसेच जलतरण तलावासाठीही त्याचा उपयोग होतो. औद्योगिक कंपन्यांमध्येही त्याचा विविध कारणांसाठी वापर होतो.