ऐतिहासिक इंदोरी पूल मोजतोय शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 03:54 IST2016-01-10T03:54:42+5:302016-01-10T03:54:42+5:30

तळेगाव दाभाडे -चाकण रस्त्यावरील इंदोरी येथे इंग्रजांनी बांधलेल्या दीडशे वर्षे जुन्या ऐतिहासिक चिरेबंदी पुलाकडे पुरातत्त्व आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.

The last element to calculate the historic Indoor Pool | ऐतिहासिक इंदोरी पूल मोजतोय शेवटच्या घटका

ऐतिहासिक इंदोरी पूल मोजतोय शेवटच्या घटका

तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे -चाकण रस्त्यावरील इंदोरी येथे इंग्रजांनी बांधलेल्या दीडशे वर्षे जुन्या ऐतिहासिक चिरेबंदी पुलाकडे पुरातत्त्व आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. दगडी चिरे गायब होणे, वृक्षतोड आदी कारणांमुळे या ऐतिहासिक ठेव्याची ऱ्हासाकडे वाटचाल सुरू आहे.
तळेगाव-चाकण राज्य मार्ग ५५ वर इंद्रायणी नदीवर इंग्रजांनी दीडशे वर्षांपूर्वी सुमारे तीनशे मीटर लांबीचा पूल उभारला. हा मावळ तालुक्यातील एक महत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे.
कोकण आणि मुंबई बंदरातून वर देशाकडे होणाऱ्या वाहतुकीला सोयीचा म्हणून बैलगाड्यांसाठी इंग्रजांनी बांधलेल्या या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिश शासनाने थेट इंग्लंडहून पुणे जिल्हा प्रशासनाला त्या आशयाचे पत्र देखील पाठविले होते. तळेगाव स्टेशनचा जुना रेल्वे पूल आणि इंदोरीचा हा ऐतिहासिक पूल एकाच कालखंडात बांधले गेल्याचे जाणकार सांगतात.
पुलाच्या मजबुतीकरणासाठी दोन्ही बाजूने रस्त्याकडेला नदीतीरावर वृक्षलागवड देखील ब्रिटिश शासनाने केली होती. इंदोरी बाह्यवळण रस्ता झाल्यानंतर नवीन पूल बांधल्यावर शासनाने या जुन्या पुलाकडे दुर्लक्ष केले आहे. पुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे १९९८ मध्ये ‘आ अब लौट चले’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण या पुलावर करण्यात आले होते. गाडी पुलावरून नदीत कोसळतानाचे चित्रीकरण करताना कठड्याची झालेली पडझड दुरुस्तीसाठी निर्मात्याने भरपाई दिली होती.
भारदस्तपणा, बांधकाम कालावधी लक्षात घेता ऐतिहासिक ठेवा म्हणून पुरातत्त्व खात्याने पूल ताब्यात घेऊन जतन करावा, असे मत इतिहासप्रेमी, अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)

सध्या पुलाची ऱ्हासाकडे वाटचाल सुरु असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इंदोरी ग्रामपंचायतीला मात्र याचे क ोणतेही सोयरसुतक दिसत नाही. सध्या फक्त इंदोरीकर आणि स्थानिक रहिवाशांकडून हलकी प्रवासी वाहने नेण्यासाठीच पुलाचा वापर होत आहे. रात्री दहानंतर पुलावरील वर्दळ जवळपास बंद होते. याचाच फायदा घेत चोर, भामटे पुलाच्या कडेची झाडे तोडत आहेत किंवा दगडी चिरे गायब करीत आहेत.
या मार्गावरून जाणाऱ्या बाहेरगावच्या पोल्ट्री फार्मच्या गाड्या मेलेल्या कोंबड्या व पिसे आणि घाण गुपचूप पुलाच्या बाजूला टाकत आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक पुलाच्या बांधकामाबरोबरच पाणी व नदीपात्र प्रदूषित होऊन इंद्रायणी नदीच्या पावित्र्यालाही धोका पोहोचत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
चोरांनी पुलाकडेची बहुतांश झाडे तोडून नेल्यामुळे आणि बांधकाम विभागाने कठडे न बांधल्याने ये-जा करणारी दुचाकी वा चारचाकी वाहने थेट नदीपात्रात कोसळण्याचा धोका आहे. ब्रिटिशकाळात हा पूल बांधण्यासाठी अवघे ३१ हजार ४३४ रुपये खर्च झाला होता. तशी कोनशिलाही पुलाच्या बांधकामावर आहे.

Web Title: The last element to calculate the historic Indoor Pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.