मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:48 IST2018-01-01T00:48:03+5:302018-01-01T00:48:17+5:30

तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दामरंचा व परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्यांची सोडवणूक प्रशासनाच्या वतीने अद्यापही झाली नाही. परिसरातील पूल, रस्ते व अन्य सोयीसुविधांचा अभाव आहे. येथील लोकांना मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा आहे.

 Lack of basic amenities | मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : दामरंचा भागातील नागरिक रस्ते, विजेच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दामरंचा व परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्यांची सोडवणूक प्रशासनाच्या वतीने अद्यापही झाली नाही. परिसरातील पूल, रस्ते व अन्य सोयीसुविधांचा अभाव आहे. येथील लोकांना मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र गावापर्यंत रस्ता निर्मिती करण्याकडे प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
कमलापूर- दामरंचा मार्गाचे अंतर २२ किमी असून सदर मार्गाची डागडूजी मागील वर्षी करण्यात आली आहे. या मार्गावर पाच ते सहा नाले येतात. मात्र या नाल्यांवर पुलांचे बांधकाम अद्यापही करण्यात आले नाही. त्यामुळे या परिसरातील भंगारामपेठा, रूपतकसा, चिटवेली, चिंतारेव, मांडरा, आसा, नैनगुडम यासह अनेक गावातील लोकांना पावसाळ्यात कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या क्षेत्रात हजारो लोकवस्ती आहे. मात्र ये-जा करण्याकरिता पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. परिणामी दळणवळणाची साधने उपलब्ध होत नाही. एसटी महामंडळाची बसही येथे पोहोचत नाही. त्यामुळे आवागमनाची समस्या नेहमीच जाणवते. नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात पक्के रस्ते तयार करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या भागाचा विकासही झालेला नाही. वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्येही तीव्र रोष आहे. यंदाच्या उन्हाळ्यात या भागातील रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बाजारपेठ उपलब्ध नसल्याने लोकांना बाहेरगावी सायकल अथवा चालत जाऊन साहित्य खरेदी करावे लागते. या भागाचा विकास खुंटला आहे.

Web Title:  Lack of basic amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.