वाकड मध्ये खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण; सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 10:28 PM2021-06-16T22:28:33+5:302021-06-16T22:29:48+5:30

आरोपींमध्ये टायगर ग्रुपच्या अध्यक्षासह होमगार्डचा समावेश

Kidnapping of a medical businessman for ransom in Wakad; Seven arrested | वाकड मध्ये खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण; सात जणांना अटक

वाकड मध्ये खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण; सात जणांना अटक

Next

पिंपरी : गर्भपाताच्या गोळ्यांचे किट असलेले औषधांचे पाकीट दुकानात ठेवल्याने खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी भीती दाखविली. तसेच धमकी देऊन पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यासाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण केले. याप्रकरणी टायगर ग्रुपचा अध्यक्ष, होमगार्ड आणि ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यासह सात जणांना अटक केली आहे. वाकड येथे मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

अशोक बेलीराम आगरवाल (वय ५३, रा. विकासनगर, किवळे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, टायगर ग्रुपचा अध्यक्ष सिद्धार्थ भारत गायकवाड (वय ३२), राहुल छगन लोंढे (वय २४), प्रकाश मधुकर ससगाणे (वय ३१), ग्रामसुरक्षा दलाचा सदस्य प्रीतेश बबनराव लांडगे (वय ३०), कमलेश राजकुमार बाफना (वय ३२), संतोष बापू ओव्हाळ (वय २८, सर्व रा. वाकड) आणि होमगार्ड असलेला आकाश विजय हारकरे (वय २७, चिखली), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने पोलीस काेठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे संगनमत करून फिर्यादीच्या डांगे चौकातील स्पंदन मेडिकलमध्ये आले. पोलीस असल्याचे भासवून आरोपींनी मेडिकलमधील कपाटातील एमटीपी किट, औषधाचे पाकीट व दोन फाइल ताब्यात घेतल्या. या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास तुमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर्व हॉस्पिटलला येरवडा कारागृहाची हवा खावी लागेल, अशी भीती दाखविली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसविले. दत्त मंदिर रोड, वाकड या परिसरात फिरवून फिर्यादी आणि डॉ. खरे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच एका तासामध्ये पाच ते सहा लाख रुपये देण्याची मागणी केली.
-----
शहर पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली आहे. बंदोबस्त तसेच पोलिसांच्या विविध उपक्रमांमध्ये या दलाचे सदस्य सक्रिय असतात. त्यातीलच एका सदस्याने गंभीर गुन्हा केल्याचे समाेर आले आहे.

Web Title: Kidnapping of a medical businessman for ransom in Wakad; Seven arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.