कमल घोलप यांचे नगरसेवकपद धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:59 IST2017-08-01T03:59:36+5:302017-08-01T03:59:36+5:30
महापालिका निवडणुकीत यमुनानगर-निगडी प्रभागातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपा नगरसेविका कमल अनिल घोलप या माळी समाजाच्या आहेत.

कमल घोलप यांचे नगरसेवकपद धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिका निवडणुकीत यमुनानगर-निगडी प्रभागातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपा नगरसेविका कमल अनिल घोलप या माळी समाजाच्या आहेत. मात्र, त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेले हिंदू मातंग जातीचे प्रमाणपत्र बोगस आहे. त्यामुळे त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी अनु विवेक गवळी यांनी केली आहे. त्यामुळे घोलप अडचणीत आल्या आहेत.
महापालिकेतील निवडणुकीत विविध जात प्रमाणपत्रांवर निवडणूक लढविणाºया सुमारे १६ जणांच्या जात प्रमाणपत्रास आक्षेप घेतला आहे. त्यात भाजपाच्या घोलप यांच्याही हिंदू मातंग या जात प्रमाणपत्रास त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार गवळी यांनी आक्षेप घेतला आहे. धाराशिव येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर बुधवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्याची माहिती देताना अनु गवळी म्हणाल्या, ‘‘घोलप या हिंदू-माळी प्रवर्गातील आहेत. तथापि त्यांनी मातंग जातीचे प्रमाणपत्र सादर करून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून निवडणूक लढविली. घोलप यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात आपण अशिक्षित असल्याचे म्हटले आहे. तथापि त्यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. कमल घोलप यांच्या शाळेच्या जनरल रजिस्टरच्या नोंदीमध्ये हिंदू-माळी जातीचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे कमल घोलप यांच्या बहिणीच्या कागदपत्रांची दक्षता पथकामार्फत तपासणी केली असता हिंदू-माळी असा जातीचा उल्लेख आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सादर केली आहेत. घोलप यांनी
राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेली सर्व प्रमाणपत्रे खोटी आहेत. त्यामुळे घोलप यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे.’’