लूटमार करणारे आरोपी जेरबंद
By Admin | Updated: April 1, 2017 02:05 IST2017-04-01T02:05:18+5:302017-04-01T02:05:18+5:30
पादचाऱ्याला मारहाण करीत ऐवज लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी १२ तासांच्या आत जेरबंद केले.

लूटमार करणारे आरोपी जेरबंद
पिंपरी : पादचाऱ्याला मारहाण करीत ऐवज लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी १२ तासांच्या आत जेरबंद केले. गणेश उत्तम सोनवणे (वय २२, रा. गवळी माथा, भोसरी), रोहण राणू शिंदे (वय २०, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, भोसरी), अक्षय रमेश धुरंधरे (वय २०, रा. विठ्ठलनगर, हनुमान सोसायटी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, एक अल्पवयीन आरोपी आहे. याप्रकरणी भरत रामनाथ पाटील (वय ५६, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेली माहिती अशी : पाटील हे माजी सैनिक असून ते मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून रिक्षात बसून नेहरुनगर येथील हॉकी स्टेडियम येथे उतरले. तेथून भोसरी एमआयडीसी येथे पायी जात असताना त्याच रिक्षातील चार मुलांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्याकडील धारदार हत्याराने पाटील यांना जखमी केले. तरीही त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चोरटे रोकड घेऊन पसार झाले. (प्रतिनिधी)