IPL वर बेटिंग घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; वाकड पोलिसांनी दहा जणांना ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Published: April 6, 2024 06:24 PM2024-04-06T18:24:04+5:302024-04-06T18:25:00+5:30

वाकड पोलिसांनी गुरुवारी (दि. ४) रात्री सव्वानऊच्या सुमारास कारवाई करून  १० संशयितांना अटक केली...

IPL betting racket busted; Wakad police shackled ten people | IPL वर बेटिंग घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; वाकड पोलिसांनी दहा जणांना ठोकल्या बेड्या

IPL वर बेटिंग घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; वाकड पोलिसांनी दहा जणांना ठोकल्या बेड्या

पिंपरी : आयपीएलमधील गुजरात टायटन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील टी-२० क्रिकेट सामन्यावर बेटिंगचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला आहे. वाकडपोलिसांनी गुरुवारी (दि. ४) रात्री सव्वानऊच्या सुमारास कारवाई करून  १० संशयितांना अटक केली. तसेच सहा लाख ५८ हजार रुपयांचे बेटिंगसाठीचे साहित्य जप्त केले.

सूर्यप्रताप कौशल्य सिंग (वय १८), राजेश छोटेलाल कुराबहू (२५), शुभम पुलसी धरू (२२), तिलेश अमितकुमार कुरेह (२५), जितू नवीन हरपाल (२८), राहुलकुमार प्रकाश कुमार उराव (२२), यश प्रसाद शाहू (१८), किशन मनोज पोपटानी (२२), समया सुखदास महंत (२६, सर्व रा. छत्तीसगढ), रणजित सरजू मुखीया (२०, रा. पुनद, ता. घनशामपूर, जि. दरभंगा, बिहार), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्यासह कार्तिक उर्फ दिनेश आहुजा (रा. नागपूर), रामू बोमन (छत्तीसगढ) यांच्या विरोधातही पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक सुनील काटे यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ५) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी वाकड येथील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये बेटिंग सुरू केले होते. सध्या देशभरात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी-२० क्रिकेट स्पर्धेचा ‘फिवर’ आहे. स्पर्धेतील गुजरात टायटन्स संघाच्या विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या संघाचा गुरुरवारी सामना झाला. या सामन्यावर संशयितांनी वेगवेगळ्या बेटिंग ॲपव्दारे स्वत:च्या तसेच नागपूर येथील कार्तिक उर्फ दिनेश आहुजा आणि रामू बोमन यांनी बेटिंग जुगार चालवला. ग्राहकांकडून हारजित होणारा रकमेचा व्यवहार केला. त्यासाठी इतर व्यक्तींच्या नावाने बनावट बँक खाते उघडून त्यावरून रक्कम क्रेडिट व डेबीट केली. 

बेटिंग सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी कारवाई केली. यात क्रिकेट बेटिंगसाठी वापरण्यात आलेले एकूण सहा लाख ५८ हजार रुपये किमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. तसेच संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस उपनिरीक्षक अतुल जाधव तपास करीत आहेत.

Web Title: IPL betting racket busted; Wakad police shackled ten people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.