साहित्यिकांना उद्योगनगरीची मोहिनी
By Admin | Updated: January 20, 2016 00:54 IST2016-01-20T00:54:23+5:302016-01-20T00:54:23+5:30
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर असून, विविध अंगाने परिपूर्ण शहर आहे. वाहतुकीची कोंडी कोठेही झाल्याचे दिसून आले नाही.

साहित्यिकांना उद्योगनगरीची मोहिनी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर असून, विविध अंगाने परिपूर्ण शहर आहे. वाहतुकीची कोंडी कोठेही झाल्याचे दिसून आले नाही. या परिसरातील उद्याने सुस्थितीत असून पर्यावरण अतिशय सुंदर आहे. भव्य रस्ते व उड्डाणपूल शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोहित करणारे आहेत, अशा भावना राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या साहित्यिकांनी व्यक्त केल्या. दोनशे साहित्यिकांनी सहलीचा लाभ घेतला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यिकांसाठी पिंपरी-चिंचवड शहर दर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. पिंपरी-चिंचवड शहरदर्शन करण्यासाठी दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, इचलकरंजी, मिरज, ठाणे, मुंबई इ. विविध भागांतून आलेल्या बहुसंख्य मान्यवरांनी या दर्शनसहलीचा लाभ घेतला. साहित्यरसिकांनी बीआरटीएस प्रकल्प, दुर्गादेवी टेकडी, भक्ती-शक्ती शिल्प, तसेच सायन्स पार्क इत्यादी ठिकाणे दाखविण्यात आली. या दर्शनसहलीमध्ये जवळजवळ २०० साहित्यिक मान्यवरांनी सहभाग घेतला. जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले व प्रवीण बागलाणे यांनी गाइड म्हणून साहित्यरसिकांना माहिती दिली. (प्रतिनिधी)