उद्योगनगरीची वाढली श्रीमंती
By Admin | Updated: May 4, 2016 04:32 IST2016-05-04T04:32:21+5:302016-05-04T04:32:21+5:30
सेवाकर, प्राप्तिकर, केंद्रीय उत्पादन शुल्कातून शहरातून सहा हजार कोटी रुपये केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सेवाकरात २० टक्के, तर

उद्योगनगरीची वाढली श्रीमंती
पिंपरी : सेवाकर, प्राप्तिकर, केंद्रीय उत्पादन शुल्कातून शहरातून सहा हजार कोटी रुपये केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सेवाकरात २० टक्के, तर केंद्रीय उत्पादनशुल्काच्या रकमेत तब्बल ४० टक्के वाढ झाली आहे. शहर आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी कर भरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र आहे, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात आॅटोमोबाईल कंपन्या व आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. २०१५-१६ या वर्षासाठी प्राप्तिकर विभागाला सुमारे अडीच हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र उद्दिष्टापेक्षा ३३६ कोटी अधिकचे जमा झाले आहेत. सेवाकर आणि केंद्रीय उत्पादन शुल्काच्या माध्यमातून २०१५-१६ या वर्षात तीन हजार शंभर कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडे जमा झालेली रक्कम एक हजार पाचशे कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवाकर चुकविणाऱ्या व्यक्तींचा आगामी काळात शोध घेऊन त्यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. दोन कोटी रुपयांच्या वर कर बुडविणारे किती आहेत याचाही शोध घेण्यात येणार आहे.
२०१४-१५ या आर्थिक वर्षात केंद्रीय उत्पादन शुल्कातून नऊशे कोटी, तर सेवाकराच्या माध्यमातून एक हजार २८० कोटींचा महसूल जमा झाला होता. जमा झालेल्या या दोन्हीही करांत मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. प्राप्तिकर विभागाला या आर्थिक वर्षासाठी तीन हजार २० कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.(प्रतिनिधी)
- या विभागाला या वर्षी दोन हजार ६८४ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मागील वर्षी या विभागाला अडीच हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. करदाते वाढविण्यासाठी केंद्रीय उत्पादनशुल्क व प्राप्तिकर विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्यामुळे या आर्थिक वर्षात दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिकचा कर जमा करण्यास या विभागांना यश आल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील नागरिक सतर्क झाल्याचे दिसत आहे. कर भरणा करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असल्याचे चित्र दिसत आहे.