‘कारवाईला आडवा आल्यास अजितदादावरही ३५३ टाका’, हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आक्रमक भूमिका
By नारायण बडगुजर | Updated: July 26, 2025 23:27 IST2025-07-26T23:27:11+5:302025-07-26T23:27:36+5:30
Ajit Pawar News: रस्ता रुंदीकरणात आडवा आलेल्यांवर कारवाई करा. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा, असे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. या कारवाईत अजितदादामध्ये आला तरी ३५३ टाका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले.

‘कारवाईला आडवा आल्यास अजितदादावरही ३५३ टाका’, हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आक्रमक भूमिका
- नारायण बडगुजर
पिंपरी - रस्ता रुंदीकरणात आडवा आलेल्यांवर कारवाई करा. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा, असे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. या कारवाईत अजितदादामध्ये आला तरी ३५३ टाका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले.
हिंजवडी माण आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांनी शनिवारी (दि. २६ जुलै) पाहणी केली. त्यावेळी स्थानिकांनी व लोकप्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा केली. आमची बांधकामे रस्ता रुंदीकरणात जात आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यावर पवार म्हणाले, आयटी पार्क परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण झाले पाहिजे. रुंदीकरणात बाधा ठरणारी बांधकामे व इतर कोणाच्याही अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करू नका. या कारवाईत कोणी आडवा आला तर त्याच्यावर कारवाई करा. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा, असे निर्देश मी यापूर्वीच दिले आहेत. या कारवाईत अजित दादामध्ये आला तरी ३५३ टाका, असे ते म्हणाले.
तुम्ही पैसे कमावता बदनामी आमची होते
आयटी पार्कमधील नैसर्गिक नाल्यावर करण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार कारवाई होत आहे. संबंधित बांधकाम करणारा बांधकाम व्यावसायिक अजित पवार यांच्याकडे विनंती करण्यासाठी आला. दादा आमची चूक झाली. आमचे बांधकाम पाडू नका, असे व्यावसायिक म्हणाला. त्यावर अजित पवार म्हणाले, तुम्ही पैसे कमावता मात्र, बदनामी राज्य शासनाची होत आहे. अशा बांधकामांना परवानगी कशी दिली जाते? हे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले.
कारवाईचा दिखावा?
अजित पवार यांनी १३ जुलै रोजी पाहणी करून हिंजवडी एमआयडीसी हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर एमआयडीसीकडून काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली. दरम्यान, पवार पुन्हा पाहणी करणार असल्याचे माहित झाल्यानंतर एमआयडीसीने शुक्रवारी पुन्हा कारवाई सुरू केली. ही कारवाई केवळ अजित पवारांना दाखवण्यासाठी केली जात आहे. कारवाई सुरू असल्याचे दिसावे यासाठी जेसीबी मशीन आणून ठेवले आहेत, असा आरोप काही नागरिकांनी केला.