- नारायण बडगुजरपिंपरी : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या मोशी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील एका खोलीत पिझ्झाचा रिकामा बॉक्स आढळला. यावरून वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी संबंधित खोलीत राहणाऱ्या मुलींना एक महिन्यासाठी वसतिगृहातून काढून टाकण्याची नोटीस दिली. याबाबत पुणे येथील स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स या संस्थेने वसतिगृहाकडे खुलासा मागितला. त्यानुसार वसतिगृहाकडून खुलासा करण्यात आला. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने मुलींना विषबाधा झाली आणि रात्रीच्या वेळी त्यांना त्रास झाला तर वसतिगृहाकडे विद्यार्थिनिंना रुग्णालयात नेण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे वसतिगृहाकडून सांगण्यात आले आहे.
वसतिगृहातील एका खोलीत ३० जानेवारी रोजी पिझ्झाचा एक रिकामा बॉक्स आढळून आला. त्याबाबत वसतिगृहाच्या गृहप्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी संबंधित खोलीत राहणाऱ्या चार विद्यार्थिनिंकडे विचारणा केली. चारही विद्यार्थिनिंनी आपण पिझ्झा मागवला नसल्याचे सांगितले. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी गृहप्रमुखांनी विद्यार्थिनिंना नोटीस दिली. त्यामध्ये ८ फेब्रुवारीपर्यंत चूक मान्य न केल्यास विद्यार्थिनिंचा एक महिन्यासाठी प्रवेश रद्द करण्यात येईल, असे नोटीसमध्ये सांगण्यात आले होते.दरम्यान, एका विद्यार्थिनीला तिच्या पालकांनी घरी नेले. याबाबत स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी वसतिगृहाकडे खुलासा मागवला. वसतिगृहाकडून खुलासा करण्यात आला असून त्यामध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्यास बाधा होऊ नये म्हणून बाहेरील खाद्यपदार्थ वसतिगृहात आणून खाण्यात बंदी असल्याचे सांगितले आहार.
सध्या उन्हाळा सुरू होत आहे. अशा वेळी खाद्यपदार्थ हे लवकर खराब होतात. बाहेरील अन्नपदार्थ कधी बनवले, त्यासाठी लागणारे अन्नघटक हे कमी गुणवत्तेचे वापरले असू शकतात. तसेच सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस या आजाराचे प्रमाण वाढत आहे. हा आजार दूषित पाणी व दूषित पाण्यात बनवलेले अन्नपदार्थ खाण्यामुळे होऊ शकतो. विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यास रात्रीच्या वेळी त्रास झाल्यास वसतिगृहात सर्व महिला कर्मचारी आहेत. रात्रीच्या वेळी एकच महिला पहारेकरी असते. अशा वेळी विषबाधेचा प्रकार घडल्यास विद्यार्थिनींना वेळेत रुग्णालयात घेऊन जाण्यास वसतिगृहात पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. वसतिगृह परिसरात त्वरित रिक्षा व इतर साधने उपलब्ध होऊ शकत नाहीत.पहारेकरी महिला रुग्णालयात गेल्यास इतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या बाबींचा विचार करून खाद्यपदार्थ वसतिगृहात आणून खाण्यास बंदी घालण्यात आली. वसतिगृहातून कोणत्याही विद्यार्थिनीला काढले नाही. एक विद्यार्थिनी तिच्या पालकांसोबत घरी गेली आहे. ती आल्यास तिला देखील वसतिगृहात घेतले जाणार असल्याचे खुलाशात म्हटले आहे.
वसतिगृहाकडून केलेला खुलासा अतिशय हास्यास्पद आहे. सामाजिक न्याय विभागाची अवस्था यातून समोर येत आहे. शासकीय व्यवस्थेची ही बदनामी आहे. -कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स, पुणे