हिंजवडी ‘टेक हब’ बनले ट्रॅफिक ट्रॅप; कंपन्या अडकल्या प्रश्नांच्या सापळ्यात
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: August 3, 2025 15:14 IST2025-08-03T15:11:39+5:302025-08-03T15:14:55+5:30
- कर्मचाऱ्यांना घरातून तीन तास अगोदर निघावे लागते. तीन तास जाण्यासाठी आणि तीन तास घरी पोहोचण्यासाठी असे सहा तास केवळ प्रवासात जात असल्याने आयटीतील कर्मचारी त्रस्त

हिंजवडी ‘टेक हब’ बनले ट्रॅफिक ट्रॅप; कंपन्या अडकल्या प्रश्नांच्या सापळ्यात
पिंपरी : तोकड्या पायाभूत सुविधा, खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि राजकीय अनास्थेमुळे हिंजवडी ‘टेक हब’ हळूहळू ओळख गमावू लागले आहे. लॉकडाउननंतर ३५ ते ४० कंपन्यांनी या परिसरातून स्थलांतर केले आहे. सव्वाशेहून अधिक कंपन्यांची संख्या आज ८६ वर आली आहे. स्थलांतरित झालेल्या कंपन्यांनी चाकण, खराडी, बाणेर, वाघोलीसारख्या पर्यायी आयटी आणि औद्योगिक परिसरांना पसंती दिली आहे.
हैदराबाद, बंगळुरू, नोएडा यांसारख्या शहरांनी सेझ, टॅक्स हॉलिडे, सिंगल विंडो क्लिअरन्स यांसारख्या धोरणांमुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना आकर्षित केले आहे. मात्र पुण्यात अद्याप परवानगी आणि शासकीय क्लिअरन्स प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या आणि वेळखाऊ आहेत. हैदराबादमध्ये खर्च कमी असून पायाभूत सोयीसुविधा अधिक आहेत. नोएडा परिसर दिल्लीजवळ असून, तिथे मोठे भूखंड उपलब्ध आहेत आणि तेथे थेट केंद्रीय धोरणात्मक फायदे मिळतात. बंगळुरूमध्ये काही अडचणी असूनही तो देशाचा ‘इनोव्हेशन हब’ असल्याने तिकडेही काही कंपन्यांचा कल आहे.
नियोजनशून्य विकास, अपुऱ्या पायाभूत सुविधा
हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव आणि प्रचंड वाहतूक कोंडी हे कंपन्यांच्या स्थलांतरामागील प्रमुख कारण ठरत आहे. कर्मचाऱ्यांना दररोज कामावर येण्या-जाण्याकरिता तीन ते सहा तास प्रवास करावा लागतो. नियोजनशून्य विकास, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि मेट्रो प्रकल्पाच्या विलंबामुळे हा त्रास अधिक वाढला आहे. रहिवासी खर्च, वाहतूक कोंडी आणि जीवनशैलीच्या अडचणींमुळे आयटी कर्मचारी नोएडा, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोचीसारख्या शहरांकडे वळत आहेत. अनेक कंपन्यांनी यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण स्वीकारले असूनही दीर्घकालीन उपाय म्हणून परिसर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
वाढता राजकीय हस्तक्षेप कंपन्यांच्या मुळावर
प्रशासन आणि राजकारणी मंडळींचाही गंभीर त्रास आहे. स्थानिक राजकीय अनास्था, वाढता हस्तक्षेप व कर्मचाऱ्यांवर येणारा दबाव यांमुळे कंपन्यांचे व्यवस्थापन अस्वस्थ आहे. काही उद्योजकांनी खासगीत सांगितले की, हिंजवडीतील प्रशासकीय कारभार गढूळ झाला आहे. येथे निर्णय घेतले जात नाहीत, तर कायमचे ‘थांबवले’ जातात.
स्थलांतराचे संभाव्य परिणाम गंभीर
हिंजवडी आयटी पार्कमधून मोठ्या प्रमाणावर कंपन्यांच्या स्थलांतरामुळे पुण्याच्या आर्थिक विकासावर गंभीर परिणाम होणार आहे. या परिसरात सुमारे तीन ते पाच लाख लोक थेट व अप्रत्यक्षरीत्या रोजगारात आहेत. कंपन्यांचे स्थलांतर म्हणजे रोजगाराच्या संधींची घट, भाडेदरांची घसरण, स्थानिक व्यवसायांवर परिणाम आणि करसंकलनात घट अशा नकारात्मक परिणामांची भीती वर्तवली जात आहे.
पर्यायी केंद्रांकडे वळण्यास सुरुवात
चाकण, खराडी, वाघोली, कोरेगाव पार्क ॲनेक्स या परिसरांनी आता नवीन आयटी क्लस्टर म्हणून विकासाला गती दिली आहे. चांगल्या रस्त्यांची जोडणी, जवळचे विमानतळ आणि कमी राजकीय हस्तक्षेप यांमुळे कंपन्यांनी या पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. हिंजवडी आयटी पार्कचा दर्जा राखण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारणा, वाहतूक व्यवस्थापन, पारदर्शक प्रशासन आणि राजकीय हस्तक्षेपापासून संरक्षण यांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.