लोणावळा : शहरात मे महिन्यातच चोवीस तासात २३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात मागील आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. यंदाचा एकूण पाऊस ४१० मि.मी. वर पोहोचला आहे.
येथे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे भागातून हजारो पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे वाहनांची व पर्यटकांची गर्दी झाली होती. लोणावळा, खंडाळा शहरातील प्रमुख चौकांत वाहतूक कोंडी झाली होती. तर, वाहनांची संख्या वाढल्याने जुना पुणे-मुंबई महामार्गावर धिम्या गतीने वाहतूक सुरू होती. मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरामध्ये रस्ते व गटारींची कामे सुरू आहेत. ती कामे अद्याप पूर्ण न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल तयार होऊन नागरिकांना वाहतुकीच्या समस्येचा सामना करावा लागला. नांगरगाव भागात गटारांची कामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. वलवणच्या काही भागांमध्ये तर भांगरवाडी परिसरातील निशिगंधा सोसायटी, आदित्य सोसायटीमध्येही पाणी शिरले होते.
नगर परिषद प्रशासनाने तत्काळ ही सर्व कामे पूर्ण करावीत, तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी जी कामे महत्त्वाची आहेत, ती करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. कार्ला येथील एकवीरा गडावर जोरदार पावसामुळे राडाराेडा रस्त्यावर वाहून आल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. त्यातून वाहने चालविताना नागरिकांची दमछाक होत आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद
लोणावळा शहराला ऑरेंज अलर्ट दिला असतानाही लोणावळा नगरपरिषदेने आपत्ती व्यवस्थापनाबाबत हालचाल केली नसल्याचे दिसत आहे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत लोणावळा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून आली.