सभागृहांची परवानगी महापौर, स्थायीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:59 IST2017-08-01T03:59:08+5:302017-08-01T03:59:08+5:30
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचा वापर महासभेसाठी करण्यात येणार आहे़ हे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी महापौरांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे.

सभागृहांची परवानगी महापौर, स्थायीकडे
पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचा वापर महासभेसाठी करण्यात येणार आहे़ हे सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी महापौरांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर मधुकर पवळे सभागृहाचा वापर इतर विभागांच्या कार्यक्रमासाठी करायचा झाल्यास स्थायी समिती सभापतींची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे, असे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महासभा होते. याशिवाय महापालिकेतील निवृत्त होणारे कर्मचारी, खेळाडू, कलाकार तसेच इतर क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या कर्मचाºयांचे सत्कार व समारंभ महापौरांच्या हस्ते केले जातात. मात्र, यापुढे महासभेशिवाय नगरसेवकांच्या बैठकीसाठी किंवा महापालिकेच्या इतर विभागाकडील महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी हे सभागृह उपलब्ध करून देण्याकरिता महापौरांची परवानगी आवश्यक असणार आहे. परवानगी प्राप्त झालेल्या पत्राची प्रत अशा विशिष्ट कार्यक्रमापूर्वी सुरक्षा विभागाकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे.
खासगी कार्यक्रमाकरिता इतर व्यक्ती अथवा संस्थांना सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार नाही. पवळे सभागृहाचा वापर प्रामुख्याने स्थायी समिती सभा, विशेष समिती सभा, विशेष समित्या, प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुका, विभागप्रमुखांची बैठक, कर्मचारी निवृत्तीचा कार्यक्रम आदींकरिता करता येईल. नगरसचिव विभागाची कार्यक्रम पत्रिका सुरक्षा विभागास देणे आवश्यक राहील.