भाविकांना गोल्डन पासचे वाटप
By Admin | Updated: January 21, 2016 00:58 IST2016-01-21T00:58:11+5:302016-01-21T00:58:11+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी कार्ला गडावर देवीच्या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी २५ हजारांहून अधिक देणगीदार भाविकांना

भाविकांना गोल्डन पासचे वाटप
लोणावळा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी कार्ला गडावर देवीच्या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी २५ हजारांहून अधिक देणगीदार भाविकांना गोल्डन पासचे वाटप करण्यात आले. २५ वर्षे या भाविकांना व्हीआयपी दर्शनरांगेत दर्शन घेता येणार असल्याची माहिती श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिली.
एकवीरेचे दर्शन व कार्ला गडावर ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेली दर्शनरांग व इतर सुशोभीकरणाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गडावर आले होते. त्यांच्या समवेत रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार तरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, जयेंद्र कुणे, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, भगवान वाल्हेकर, माजी उपसभापती शरद हुलावळे, उपतालुकाप्रमुख सुरेश गायकवाड, शिक्षण मंडळ सभापती बाळासाहेब फाटक, अंकुश देशमुख, विश्वस्त संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळुराम देशमुख, विलास कुटे, राजू खांडभोर आदी उपस्थित होते.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खासगी हेलिकॉप्टरने ठाकरे कार्ला गडावर दाखल झाले.
ट्रस्टच्या वतीने गडावर फटाक्यांची आतषबाजी करत बँडच्या तालावर ठाकरे परिवाराचे स्वागत करण्यात आले. उद्धव व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते मंदिरात देवीला साडीचोळी वाहत देवीची आरती व पूजा करण्यात आली. (वार्ताहर)