शहरात स्त्रीशक्तीचा जागर पोलीस ठाण्यातर्फे गौरव
By Admin | Updated: March 9, 2016 00:32 IST2016-03-09T00:32:42+5:302016-03-09T00:32:42+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त शहरात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि शासकीय संस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शहरात स्त्रीशक्तीचा जागर पोलीस ठाण्यातर्फे गौरव
पिंपरी : जागतिक महिला दिनानिमित्त शहरात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि शासकीय संस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शाळा-महाविद्यालयांमध्येही महिला दिनाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थिनींसाठी मेंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते.
पिंपरी पोलीस ठाण्यातर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी पोलीस परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस उपायुक्त मोहन विधाते, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मीनल पटवेकर, नगरसेविका सुजाता पालांडे, छाया साबळे, जयहिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योतिका मलकानी, पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांचे सन्मानचिन्ह देण्यात आले. कौटुंबिक समस्या निवारण झालेल्या दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच महिला व बालअत्याचार यावरील नाटिका सादर करण्यात आली. तसेच एम. अशोक यांचा हसरी मैफल कार्यक्रम सादर झाला.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन
निगडीतील माता अमृतानंदनमयी मठाच्या वतीने अमृतचेतना या उपक्रमांतर्गत चिंचवड येथील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी घेतली जात आहे. याकरिता ज्येष्ठ समुपदेशक श्रीकांत पोहनकर यांचा वर्गही भरवला गेला. विद्यार्थ्यांसह पालकांशीही अतिशय मौलिक संवाद त्यांनी साधला. स्मरणशक्तीकरिता विविध पद्धतीचा अवलंब करीत त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
ताराबाई मुथा प्रशाला
चिंचवड येथील कन्या प्रशालेत स्त्रियांच्या विविध विषयांवरच्या कविता शिक्षकांनी सादर केल्या. अॅड. राजेंद्र मुथा, अनिल कांकरिया, मीना बेंडाळे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. स्त्रियांच्या विविध पैलू व्यक्त करणाऱ्या कविता व गायन सादर झाले. स्पर्धेत सारंगा भारती, कल्पना गोरडे, निर्मला नाईक, संगीता नहार, वंदना ताकभाते, संगीता नहार, पल्लवी दुसाने, अपर्णा बांदल, सुजाता चव्हाण, राजश्री कोटस्थाने, स्वाती नेवाळे, वैशाली जाधव यांनी कविता सादर केल्या. स्त्रीशक्ती सादरीकरण झाले. नववीच्या विद्यार्थ्यांनी बालिका गीत व बेटी बचाओ सादर केले. अंजू सोनावणे, विजया जोशी यांनी संयोजन केले. श्रद्धा जैन यांनी आभार मानले.
यशस्वी विद्यालय
यशस्वी प्राथमिक विद्यालयात महिला पालकांना व विद्यार्थिनी डॉ. गौरी गावडे यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये महिला पालकांची स्त्रीची भूमिका काय असते व स्त्रीने स्वत:कडे लक्ष काय असते, याची जाणीव करून दिली. सुभाष देवकाते यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी मार्गदर्शन केले. माधुरी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री भुजबळ यांनी आभार मानले.
जयवंत शाळा
चिंचवड येथील जयवंत प्राथमिक शाळेत डॉ. सपना गांधी यांचे महिलांचे आरोग्य, आहार व व्यायाम या विषयावर व्याख्यान झाले. मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी स्त्री स्वतंत्र व स्वावलंबी बनली पाहिजे, हे सांगितले. महिला पालकांच्या स्मरणशक्तीसाठी ‘खेळ जिंकणार कोण’? हा कार्यक्रम झाला. त्यामध्ये रिंग टाकणे, उखाणे स्पर्धा, संगीतखुर्ची घेण्यात आली. शबाना शेख व सुरेखा स्वामी यांनी संयोजन केले.
नवनाथ साबळे शाळा
भाटनगर येथील नवनाथ साबळे शाळेत सचिन साबळे, अभिजित कुंजीर यांनी शिक्षक महिलांचा सत्कार केला. महिलांसाठी केक कापून गुलाबपुष्प देण्यात आले. प्रभावती कांबळे, लक्ष्मी कुंजीर, गौतमी गायकवाड यांनी संयोजन केले. उषा चौधरी, उज्ज्वला चाळेकर, विद्या खुरंगे, यांनी सूत्रसंचालन केले.
विद्या पवार व प्रतिभा चौधरी यांनी माहिती दिली. कल्पना सुतार यांनी आभार मानले.
दिघी कन्या शाळा
दिघी येथील महापालिका कन्याशाळेतील कर्तबगार महिलांचा या वेळी सन्मान करण्यात आला. या वेळी शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, नगरसेवक चंद्रकांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद लोखंडे, राजेंद्र तापकीर, अध्यक्षा मोहिनी जाधव, सुनंदा मुळे, मुख्याध्यापिका संध्या गवळी आदी उपस्थित होते नगरसेविका आशा सुपे, डॉ. दीपिका कदम, प्राध्यापिका सुषमा शिर्के, शारदा निंदानिया यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तुकाराम लांघी यांनी प्रास्ताविक केले. अविनाश वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले.
महात्मा फुले महाविद्यालय
पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये, महात्मा फुले महावियालय आणि नव समाज युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा झाला. स्त्री- पुरुष समानतेबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शीतल आल्हाट यांनी मनोगत व्यक्त केले. प्रविण डोळस आणि सिद्धांत गागडे यांच्या पुढाकाराने कार्यक्रम साजरा झाला. नव समाज युवा मंचचे एच. व्यंकटेश, ऋषिकेश दिवेकर, अनिता भालेकर आदींनी पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक भोईटे, प्रा. अल्का चव्हाण, प्रा. दीपक बोरगावे, प्रा. दिनकर मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले.
आकुर्डीत कर्मचाऱ्यांचा सत्कार
राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे औचित्य साधून आझमभाई पानसरे युथ अण्ड सोशल वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी आकुर्डी मधील हेडगेवार भवन येथे शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार माजी महापौर आझम पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवाणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहाध्यक्ष संजोग वाघेरे, महिलाध्यक्षा सुजाता पालांडे, निलोफर पानसरे, नगरसेवक जगदिश शेट्टी, राजू मिसाळ, प्रसाद शेट्टी उपस्थित होते.(प्रतिनिधी)