गाथा, ज्ञानेश्वरी हे ज्ञानकोषच
By Admin | Updated: November 11, 2016 01:45 IST2016-11-11T01:45:22+5:302016-11-11T01:45:22+5:30
संतांनी जाती-धर्म पाळले नाहीत. त्यांनी जातिव्यवस्थेवर आसूडच ओढले आहेत. ज्ञानेश्वरी आणि गाथा म्हणजे ज्ञानकोष आहेत

गाथा, ज्ञानेश्वरी हे ज्ञानकोषच
देहूगाव : संतांनी जाती-धर्म पाळले नाहीत. त्यांनी जातिव्यवस्थेवर आसूडच ओढले आहेत. ज्ञानेश्वरी आणि गाथा म्हणजे ज्ञानकोष आहेत, असे प्रतिपादन हभप शंकरमहाराज शेवाळे यांनी येथे दिवंगत माजी शालेय शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कीर्तनात केले.
श्री संत तुकाराममहाराज संस्थान आणि ग्रामस्थांनी येथील शिवाजी चौकात आयोजित केलेल्या कीर्तनातून हभप शेवाळे यांनी
विविध दाखले देत
प्रा. मोरे यांचा जीवनपटच उलगडला. देहूकरांनी प्रा. मोरे यांच्या जयंतीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करून आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे.
‘साहोनिया टाके घाय, पाषाण देवची झाला पाहे’ या अभंगाचे निरुपण करीत शेवाळे महाराजांनी प्रा. मोरे यांनी कसे जीवन व्यतीत केले याची माहिती दिली. ते कीर्तनात म्हणाले, ‘‘माणसाने नेहमी अवलोकन केले पाहिजे. अवलोकन करताना सिंहावलोकन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे निर्णय चुकत नाही.
संत तुकाराममहाराजांनी जगाला सर्वात प्रथम सज्जनांची निर्मिती कशी होते याचे विश्लेषण ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या अभंगातून सांगितले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी माणसाच्या दु:खाची जन्म-मरणाचे दु:ख, दरिद्राचे दु:ख, रोगाचे दु:ख ही तीन कारणे सांगितली.
प्रत्येक माणसाने संत तुकारामांची गाथा व संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा
सखोल अभ्यास करावा. त्यामध्ये जेवढा खोलवर जाल तेवढे माणसाच्या हाती मोती लागतील. तर जेवढे वर जाल तेवढे तारे हाती लागतील एवढे अगाध ज्ञान देणारे हे ज्ञानकोष आहेत.’’
प्रा. मोरे यांनी राजकीय जीवनात अनेक धाडसी निर्णय घेतले. निश्चय दृढ असल्याने विरोध पत्करूनही निर्णय घेतले. देवपण हे
सहजासहजी येत नाही. त्यासाठी संघर्ष व कष्ट आहेतच. संसारात आपले जीवन व्यतीत करीत असताना आई घराचा कळस, तर बाप हा घराचा पाया आहे. हे जोपर्यंत भक्कम आहे, तोपर्यंत आपले जीवनही डळमळीत होणार नाही, असे शेवाळेमहाराज म्हणाले. (वार्ताहर)